प्रशांत रोडे अमरावतीचे नवे मनपा आयुक्त; शासकीय सुटीच्या दिवशी घेतला पदभार - Prashant Rode Appointed Amravati Municipal Corporation Commissioner | Politics Marathi News - Sarkarnama

प्रशांत रोडे अमरावतीचे नवे मनपा आयुक्त; शासकीय सुटीच्या दिवशी घेतला पदभार

सरकारनामा ब्युरो
रविवार, 15 मार्च 2020

दहा वर्षापूर्वी उपायुक्त पदावर काम केलेल्या अनुभवी प्रशांत रोडे यांची अमरावती महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शनिवारी शासकीय सुटीच्या दिवशी मावळते आयुक्त संजय निपाणे यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला

अमरावती :  दहा वर्षापूर्वी उपायुक्त पदावर काम केलेल्या अनुभवी प्रशांत रोडे यांची अमरावती महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शनिवारी (ता.14) शासकीय सुटीच्या दिवशी मावळते आयुक्त संजय निपाणे यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.

शासनाने शुक्रवारी (ता.13) संजय निपाणे यांचे स्थानांतर करून त्यांच्या जागी प्रशांत रोडे यांची आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश काढले. दोन्ही अधिकाऱ्यांना मध्यान्हानंतर कार्यमुक्त करण्यात आले. निपाणे यांना तूर्त प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या नव्या नियुक्तीचे आदेश लवकरच निघणार आहेत. दरम्यान शनिवारी (ता.14) सकाळी 11 ला प्रशांत रोडे यांनी आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली. संजय निपाणे यांनी त्यांना महापलिकेच्या सर्व विभागप्रमुखांच्या उपस्थितीत पदभार सोपवला.

यावेळी आयोजित समारंभात संजय निपाणे यांना निरोप देण्यात आला. त्यांचा नवनियुक्त आयुक्तांसह सर्व विभागप्रमुखांनी सत्कार केला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व विभागप्रमुखांची छोटेखानी बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. शहरातील अडचणी, समस्या, कामांचे स्वरूप, सद्य:स्थिती जाणून घेतली. सोमवारपासून ते नियमित कामास सुरुवात करणार आहेत.

25 ऑक्‍टोबर 2007 ला प्रशांत रोडे या महापालिकेत उपायुक्त म्हणून रुजू झाले होते. 24 ऑगस्ट 2010 पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. त्यानंतर विविध ठिकाणी त्यांनी काम केले. विद्यमान स्थितीत ते औरंगाबाद येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. उत्पन्न वाढल्याशिवाय पूर्ण सुविधा पुरविता येणार नसल्याने या कामास प्राधान्य देण्याची भूमिका नवनियुक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केली. याशिवाय स्वच्छ शहर, आरोग्य, साफसफाई, शिक्षण यावरही भर दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्पन्नवाढ हे महत्वाचे आव्हान

महापालिका क्षेत्रफळ, लोकसंख्या व सोयीसुविधा याचा ताळमेळ बघून उत्पन्नवाढीचे आव्हान आपल्यासमोर असल्याचे नवनियुक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले. दहा वर्षापूर्वीची महापालिका, शहर व आताची स्थिती बघता मालमत्ताकरातून मिळणाऱ्या उत्पन्नावर लक्ष केंद्रात करणार असल्याचे ते म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख