प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानंतर बुचके, मोकाटे, बाबर यांना सेनेचा कारवाईचा दणका?

प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानंतर बुचके, मोकाटे, बाबर यांना सेनेचा कारवाईचा दणका?

राजगुरुनगर : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या अहवालानुसार पुणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून अजूनही काही कारवाया होऊ शकतात, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजली आहे. कितीही जुना आणि निष्ठावंत नेता अथवा कार्यकर्ता असला तरी बेशिस्तपणा आणि बेईमानी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराच पक्षाने यानिमित्ताने दिला आहे. 

 माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर यांच्यानंतर, जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके, जिल्हाप्रमुख राम गावडे आणि चार तालुकाप्रमुखांवर झालेली कारवाई पक्षाने अंदाजपंचे आणि घाईगडबडीत केलेली नसून, प्रशांत किशोर यांच्या पथकाने दिलेल्या अहवालानुसार केली असल्याचे समजते. निवडणुकीदरम्यान किशोर यांच्या संस्थेचे शंभरावर कर्मचारी मतदारसंघात फिरत होते. त्यामुळे त्यांच्याकडे वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध झाली. निकालानंतर त्या माहितीची पडताळणी आणि विश्लेषण होऊन सध्याच्या कारवाया केल्याचे बोलले जात आहे. 

पूर्वीप्रमाणे पूर्णपणे नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर अवलंबून राहून पक्ष आता धोरण किंवा डावपेच राबवित नाही. त्यासाठी व्यावसायिक संस्थांची मदत घेतली जाते. तसेच कारवायाही कोणाच्या सांगण्यावर आधारित होत नसून वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे केल्या जात आहेत. शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव पक्षाच्या जिव्हारी लागल्याने याठिकाणी कारवाया केल्या जात आहेत. शिवसेनेतीलच नेत्याने दुसऱ्या पक्षात जाऊन पक्षाच्या ज्येष्ठ खासदाराला पराभूत केल्यामुळे या पराभवाबद्दल तीव्र भावना आहेत. 

जुन्नर विधानसभा मतदारसंघात कोल्हेंना सर्वाधिक मताधिक्य मिळाले. त्यातच आढळरावांच्या पराभवानंतर, जुन्नर विधानसभेचे संभाव्य उमेदवार असलेल्या शरद सोनवणेंच्या विरोधात बुचके जाहीर आणि जळजळीत बोलत होत्या. तसेच अपक्ष लढण्याचीही भाषा करीत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देत होत्या. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई त्यांनाही अनपेक्षित नव्हती, त्यामुळे धक्का बसण्याचे कारण नाही, अशी शिवसेनेमध्ये चर्चा आहे. आधीच दुखावलेल्या पक्षाला, जास्त डिवचल्यामुळे बुचके यांच्यावर केवळ पदावरून दूर करण्याची कारवाई न करता पक्षातून काढून टाकण्याचीच कारवाई करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com