प्रशांत गडाख यांच्या वाढदिवशी जमली 16 लाखांची पुस्तके 

हार-तुरे व डामडौलाला फाटा देत वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा आदर्श प्रशांत पाटील गडाख यांनी यानिमित्त तरुणांसमोर ठेवला आहे. शेता-बांधावरील फेटा, टोपी घालणारे लोक पुस्तके भेट देतानाचे आगळे चित्र यानिमिताने दिसले.
Prashant Gadakh Collected Books on Birthday for Needy
Prashant Gadakh Collected Books on Birthday for Needy

सोनई (नगर) : यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी आपल्या वाढदिवसानिमित 'पुस्तक भेट' हा उपक्रम राबविला. त्यांनी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील अनेकांनी साथ देत सुमारे 16 लाख रुपयांची पुस्तके जमा झाली. लवकरच ही पुस्तके विविध वाचनालयांना मोफत देण्यात येणार आहेत. 

हार-तुरे व डामडौलाला फाटा देत वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा आदर्श प्रशांत पाटील गडाख यांनी यानिमित्त तरुणांसमोर ठेवला आहे. शेता-बांधावरील फेटा, टोपी घालणारे लोक पुस्तके भेट देतानाचे आगळे चित्र यानिमिताने दिसले.

"वाढदिवस हा कौटुंबिक सोहळा असावा, असे माझे वैयक्तिक मत आहे. या वेळी वाढदिवस साजरा करण्यामागे माझा एक स्वार्थ आहे. आपण सर्वांनी सुरू केलेल्या 'गाव तिथे वाचनालय' या उपक्रमात मला अधिकाधिक पुस्तके हवी आहेत. 27 तारखेला मळ्याबाहेर एक पुस्तकांचा स्टॉल असेल. त्या स्टॉलवर विविध क्षेत्रांतील ग्रंथ विक्रीसाठी असतील. तेथून खरेदी केलेल्या प्रत्येक ग्रंथाचे निम्मे पैसे मी स्वतः भरणार आहे आणि निम्मे पैसे तुम्ही द्यावेत, अशी अपेक्षा आहे,'' असे आवाहन गडाख यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केले होते.

गडाख यांना भेटण्यासाठी त्यांचे मित्र, हितचिंतक सोनई येथील मळ्यात सकाळी नऊपासून येत होते. त्यात पत्रकार, साहित्यिक, वकील, डॉक्‍टर, प्राध्यापक, महिला, विद्यार्थी, फेटे घातलेली ज्येष्ठ मंडळी, तसेच समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले अनेक जण येत होते. घराच्या अग्रभागी पुस्तकांचा स्टॉल होता. प्रत्येक जण तेथून पुस्तक खरेदी करून गडाख यांच्या हातात देऊन शुभेच्छा देत होता. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, महिलांना, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना या पुस्तकांचा फायदा होईल, या भावनेतून गडाख यांनी हा अभिनव उपक्रम राबविला.

या वाढदिवसानिमित्त आमदार शंकरराव गडाख मित्रमंडळाने राळेगणसिद्धी येथील प्राथमिक शाळेला पुस्तके भेट दिली व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत यशवंतराव गडाख यांच्या विचारांचा वसा तरुणाई जोपासत आहे. गडाखांची सामाजिक बांधिलकी उत्तम असल्याचा अण्णांनी लिहून दिलेला अभिप्राय श्‍याम पठारे यांनी या वेळी उपस्थितांना वाचून दाखविला.

इस्राईलमधून आली दहा हजारांची पुस्तके

सोनई महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या इस्राईलमध्ये असलेले डॉ. रवींद्र फाटके व डॉ. नीता फाटके यांनी प्रशांत पाटील गडाख यांची सोशल मीडियावरील पोस्ट वाचून दहा हजार रुपयांची पुस्तके गडाख यांना भेट दिली.

यशवंतराव गडाख यांच्यामुळे साहित्याची गोडी

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यामुळे आम्हा कुटुंबीयांना साहित्याची गोडी लागली. पुस्तक वाचनाचे महत्त्व कळाले. हे ज्ञान व सवय आपल्यापुरती न राहता आपल्या माणसांत पोचावी, या उद्देशाने "गाव तेथे वाचनालय' ही संकल्पना सुचली. भेट आलेली पुस्तके गावोगावच्या वाचनालयांना पाठविण्यात येणार आहेत. मी स्वतः हे सगळे ग्रंथ खरेदी करू शकलो असतो; पण यामागे "हे मी केले' असे न होता, "हे आपण सर्वांनी केले' हा संदेश जावा आणि वाचन चळवळ आणखी बळकट व्हावी, अशी माझी भावना होती, असे यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com