Prashant Bamb explains his side | Sarkarnama

मला बोलूच द्यायचे नाही, ही लोकशाहीची पध्दत नाही :  प्रशांत बंब

सरकारनामा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

.

औरंगाबादः मतदारसंघात गेल्या दहा वर्षात केलेली विकासकामे मी पुराव्यानिशी लोकांसमोर मांडतोय. गावागावात जाऊन पुढच्या पाच वर्षात काय करणार याचे नियोजन देखील सांगतोय, पण काही लोकांनी मला बोलूच द्यायचे नाही असे ठरवलं तर मग, ही काही लोकशाहीची पध्दत नाही. केवळ राजकीय हेतूने माझ्यावर आरोप केले जात असल्याचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी स्पष्ट केले.

गावभेटी दरम्यान, आमदार प्रशांत बंब आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदारसंघातील गळनिम गावात वादावादी झाली. याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करतांना प्रशांत बंब म्हणाले, प्रहार संघटनेचे भाऊसाहेब शेळके यांनी बैठकीत माझ्यावर आरोप करत काही प्रश्‍न उपस्थित केले. पण जेव्हा मी त्याची उत्तर द्यायला लागलो तर त्यांची ऐकून घेण्याची तयारी नव्हती.

मी वारंवार त्यांना'मी तुमचे एकले आता, तुम्ही माझे म्हणणे ऐका' अशी विनंती करत होतो, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावर माझे म्हणणे एकच आहे, मी माझे काम घेऊन लोकांसमोर जाणार. त्यांना पटले तर ते मला मतदान करतील, नाही तर त्यांनी खुशाल माझ्या विरोधात प्रचार करावा असे माझे त्यांना आवाहन आहे. पण समोरच्या व्यक्तीचे ऐकूनच घ्यायचे नसेल, तर याला लोकशाही म्हणत नाही.

बैठकीत प्रश्‍न विचारणारे भाऊसाहेब शेळके यांना माझ्या विरोधात निवडणूक लढवायची आहे, त्यामुळे त्यांनी केलेले आरोप हे केवळ राजकीय हेतूने केलेले आहेत. माझ्या चांगल्या वाईट कामाचे मुल्यमापान मतदार करतील आणि ते योग्य निर्णय घेतील अशी मला अपेक्षा असल्याचे बंब यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख