चिखलीकरांचे भ्रष्ट अधिकारी, कंत्राटदारांशी संबंध - प्रशांत बंब

बंब आपल्या पत्रात पुढे म्हणतात, माझ्या तक्रारीची शहानिशा करून संबंधित अधिकाऱ्याला खासदार म्हणून आपण जाब विचारायला हवा होता. प्रकरणातील गांभीर्य आणि झालेला भ्रष्टाचार पाहून आपण स्वतःच पोलीस स्टेशन किंवा ऍन्टीकरप्शन विभागात तक्रारदार म्हणून उभे राहाल अशी अपेक्षा होती.
 चिखलीकरांचे भ्रष्ट अधिकारी, कंत्राटदारांशी संबंध - प्रशांत बंब

औरंगाबाद : नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांच्या संदर्भात गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेऊ नका असे सांगणारे पत्र नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रधान सचिवांना पाठवले आहे. चिखलीकरांनी प्रधान सचिवांना पाठवलेल्या पत्राची प्रत आमदार प्रशांत बंब यांनी मिळवली आहे. एवढेच नाही तर 31 डिसेंबर 2019 रोजी या पत्राचे उत्तर प्रताप पाटील चिखलीकरांना स्पीड पोस्टद्वारे पाठवले आहे. 

आता या पत्रानंतर चिखलीकर आणि बंब यांच्यात वाद सुरू झाले आहेत. दोघेही एकमेकावर गैरव्यवहाराचा आरोप करत आहेत. बंब यांनी चिखलीकर यांना एक उत्तर पाठवले आहे. चिखलीकरांचेच भष्ट अधिकारी आणि कंत्राटदारांशी संबध असल्याचा आपल्याला संशय असल्याचा आरोप बंब यांनी केला आहे. आपल्या पत्रात बंब चिखलीकर यांना म्हणतात की माझ्या तक्रारीची दखल घेऊ नका हे आपले पत्र वाचून आपल्याला धक्का बसला व देश आणि राज्यातील लोकप्रतिनिधी कसे भ्रष्टाचारात बुडून लुप्त आहेत हे ही समजले. 

बंब आपल्या पत्रात पुढे म्हणतात, माझ्या तक्रारीची शहानिशा करून संबंधित अधिकाऱ्याला खासदार म्हणून आपण जाब विचारायला हवा होता. प्रकरणातील गांभीर्य आणि झालेला भ्रष्टाचार पाहून आपण स्वतःच पोलीस स्टेशन किंवा ऍन्टीकरप्शन विभागात तक्रारदार म्हणून उभे राहाल अशी अपेक्षा होती. आता देखील आपण या प्रकरणाची शहानिशा करून उलट टपाली पत्राने माझ्या तक्रारीतील तथ्य मला कळवाल अशी अपेक्षा करतो असेही बंब यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. 

गुन्हा दाखल असलेल्या कंत्राटदाराला काम 
मी ब्लॅकमेलिंगचे काम करतो हा आरोप आपण मागील वर्षी नागपूर हिवाळी अधिवेशनात माध्यमांसमोर केला होता. ज्या प्रकरणावरून आपण माझ्यावर आरोप करत पत्रकार परिषद घेतली त्याच प्रकरणात मी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर संबंधितावर गुन्हे दाखल झाले. या प्रकरणातील आरोपीपैकीच एक कंत्राटदार आहे जो आपल्या मतदारसंघात काम करतो आहे असा दावा देखील बंब यांनी आपल्या उत्तरात केला आहे. 

आतापर्यंत आपण केलेल्या तक्रारीपैंकी एकही तक्रार मागे घेतलेली नाही, सातत्याने पाठपुरावा करून अनेक प्रकरणात मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असतांनाही उच्च न्यायालयात दाद मागितलेली आहे. अशावेळी मला साथ देण्याऐवजी आपण भ्रष्ट अधिकारी व कॉन्ट्रॅक्‍टरांशी हातमिळवणी केल्याचा मला संशय येतो. मी केलेल्या तक्रारी खोट्या असतील तर आपण माझ्या विरोधात कायदेशीर कारवाई किंवा पक्षश्रेष्ठींकडे माझी तक्रार करू शकता असे आव्हानही बंब यांनी चिखलीकरांना दिले आहे. 

हजारो कोटींचे रस्ते कागदावरच... 
माझ्या तक्रारीमुळे विकास कामात अडथळा निर्माण होतो हा आपला आरोप देखील हस्यास्पद आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या चौकशा होऊ द्यायच्या नाही, त्यांना पाठीशी घालायचे हाच खरा विकासकामातला अडथळा आहे. आपण पाठवलेल्या पत्रातूून हेच सिध्द होते. मराठवाड्यातील हजारो कोटींचे रस्ते हे केवळ कागदावरच दाखविण्यात आले आहेत. या बाबत मी जीवाची पर्वा न करता लढा देत आहे, कारण या कामासाठी राज्यातील सर्वसामान्य, गोरगरिबांचा पैसा लागलेला आहे. नियमबाह्य काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम लोकप्रतिनिधाचे असते. राज्यातील जनतेच्या हितासाठी मतदारसंघाची मर्यादा नसते, मी जरी एका मतदारसंघातून निवडूृन आलो असलो तरी घटनेने दिलेल्या अधिकारानूसार मी राज्यातील कुठल्याही चुकीच्या गोष्टीवर आवाज उठवू शकतो, प्रशासनावार नियंत्रण ठेवण्यासाठी लक्ष घालू शकतो असेही बंब यांनी चिखलीकरांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com