पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपचेच वर्चस्व, बंब यांना मात्र धक्का...

 पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपचेच वर्चस्व, बंब यांना मात्र धक्का...

औरंगाबाद : राज्याच्या सत्तेत जरी महाविकास आघाडी असली तरी, आघाडीचा फारसा प्रभाव अजून स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये दिसत नाहीये. औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ पंचायत समिती सभापती-उपसभापती पदासाठी झालेल्या आजच्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेना-भाजपचेच वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले. नऊपैकी पाच पंचायत समितीमध्ये सभापती व उपसभापती पद पटकावत शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली आहे. त्याखालोखाल भाजपने तीन सभापती व दोन उपसभापती पद मिळवत जिल्ह्यात अजूनही युतीचाच बोलबाला असल्याचे दाखवून दिले. 

जिल्ह्यातील औरंगाबाद, फुलंब्री, पैठण, सिल्लोड, सोयगांव, कन्नड, वैजापूर, गंगापूर व खुल्ताबाद या नऊ पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी आज निवडणुका घेण्यात आल्या. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या या स्थानिक निवडणुकीत जिल्ह्यातील आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला संदीपान भुमरे व अब्दुल सत्तार यांच्या रुपाने अनुक्रमे कॅबिनेट व राज्यमंत्री अशी दोन मंत्रीपद मिळाली. त्यामुळे या मंत्र्यांच्या पंचायत समितीत काय घडते ? याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते. 

पैठणमध्ये बिनविरोध निवड.. 
कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण पंचायत समितीमध्ये शिवसेनेने सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे आपल्याकडे कायम राखली. अशोक भवर यांची सभापती तर कृष्णा भुमरे यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. तिकडे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील आपल्या मतदारसंघातील सिल्लोड व सोयगांव या दोन्ही पंचायत समित्या सभापती व उपसभापती पदासह जिंकत आपले वर्चस्व दाखवून दिले. सिल्लोड पंचायत समितीच्या सभापतीपदी कल्पना जामकर, उपसभापतीपदी काकासाहेब राकडे यांची नऊ विरुध्द सात मतांनी निवड करण्यात आली. तर सोयगांव पंचायत समितीच्या सभापती पदी रस्तूल बी उस्मान खान पठाण, तर उपसभापती पदी सोहबराव जंगलू गायकवाड यांची 4 विरुध्द 2 मतांनी निवड झाली. 

कन्नड-फुलंब्री-खुल्ताबाद भाजपकडे 
भाजपने जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांमध्ये सभापतीपद पटकावले. कन्नड पंचायत समितीमध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या आघाडीच्या मदतीने अप्पाराव घुगे सभापती, तर डॉ. नयना तायडे उपसभापती झाल्या. माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी फुलंब्रीची पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासह आपल्याकडे बिनविरोध कायम राखली. सविता फुके यांची सभापती, तर संजय त्रिभूवन यांची उपसभापती पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. खुल्ताबादमध्ये भाजपचे गणेश अधाने सभापती तर उपसभापती रेखा चव्हाण अपक्ष यांची निवडण झाली. 

गंगापूरात बंब यांना धक्का 
गंगापूर पंचायत समिती निवडणुकीत भाजप आमदार प्रशांत बंब यांना धक्का बसला आहे. इथे शिवसेनेने सभापतीपद भाजपकडून हिसकावून घेत उपसभापती पद देखील पटकावले. सभापतीपदी सविता केरे, तर उपसभापती पदी संपत छाजेड यांची निवड झाली आहे. 9 विरुध्द 8 अशा एका मताच्या फरकाने शिवसेनेने भाजपवर विजय मिळवला. वैजापूरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकमेकांच्या मदतीने सभापती आणि उपसभापती पद पटकावले. सभापतीपदावर शिवसेनेच्या सनाताई मिसाळ तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे राजेंद्र मगर यांची निवड करण्यात आली. 
कॉंग्रेसला एकमेव सभापती पद 
कॉंग्रेसला मात्र जिल्ह्यातील केवळ एका पंचायत समितीमध्ये सभापतीपद मिळवण्यात यश आले. औरंगाबाद पंचायत समितीच्या सभापतीपदी कॉंग्रेसच्या छाया घागरे यांची तर उपसभापती पदी शिवसेनेच्या मालती पडूळ यांची निवड झाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com