छोरा गंगा किनारे वाला...वर ताल धरला आमदार प्रशांत बंब यांनी...

छोरा गंगा किनारे वाला...वर ताल धरला आमदार प्रशांत बंब यांनी...

औरंगाबाद : " छोरा गंगा किनारे वाला, खुल जाय बंद अकल का ताला...' या डॉन चित्रपटाताली सुपरहिट गाण्यावर खास अमिताभ बच्चन स्टाईलने डान्स करत भाजप आमदार प्रशांत बंब यांनी सर्वांनाच आर्श्‍चयाचा सुखद धक्का दिला. निमित्त होते त्यांच्या जेष्ठ कन्येच्या विवाहाचे. आमदार प्रशांत बंब म्हणजे सडपातळ देहयष्टी, पण तितकाच कणखर आणि आक्रमक बाणा. गंगापुर-खुल्ताबाद विधानसभा मतदारसंघात त्यांच्या या स्वभावाचा अनुभव अनेकांना आला आहे. अगदी विधानसभेत मतदारसंघ असो की राज्यस्तरावरचा एखादा प्रश्‍न. अभ्यासपुर्ण आणि आक्रमकपणे आपली बाजू मांडत सगळ्यांना प्रभावित करण्यात बंब यशस्वी झालेले आहे. 

राजकारणात विरोधकांना नामोहरम करणाऱ्या प्रशांत बंब यांचे हटके रुप नुकतेच लोकांना पहायला मिळाले. बंब यांच्या मोठ्या मुलीचा विवाह नुकताच त्यांच्या लासूर या राहत्या गावी पार पडला. आमदार कन्येचा विवाह म्हटला की, कोट्यावधींची उधळण, ऑर्केस्ट्रा, डीजे, खाद्यपदार्थांची रेचलेच, पाहुण्याचा बडेजाव आणि पंचक्रोशीत या विवाह सोहळ्याची चर्चा ओघाने आलीच. पण बंब यांनी या बाबतीतही सर्वाना आश्‍चर्याचा धक्का दिला. आपल्या कन्येचा विवाह त्यांनी अगदी साध्या पध्दतीने आणि साखरपुड्यातच केला. लग्न समारंभावर होणारा कोट्यावधींचा खर्च टाळून तो पैसा समाजोपयोगी कामात खर्च करण्याचा बंब यांचा मानस. 

असा हा साधा विवाह सोहळा गेल्या आठवड्यात मोजक्‍या निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याची जितकी चर्चा साधेपणामुळे झाली तितकीच चर्चा वधुपिता आमदार प्रशांत बंब यांनी मुलीच्या लग्नात केलेल्या भन्नाट डान्सची देखील झाली. नातेवाईक आणि मुलीच्या आग्रहा खातर बंब यांनी डॉन चित्रपटातील गाण्यावर ठेका धरला. पण गाणे रंगात आले तसे बंब यांच्यातील कलाकार जागा झाला. छोरा गंगा किनारे वाला, या डॉन चित्रपटातील गाण्यावर बंब यांनी भन्नाट डान्स करत उपस्थितांना तोंडात बोट घालायला लावले. अगदी अमिताभ स्टाईलमध्ये बंब पाच ते दहा मिनिटे गाण्यावर नाचत होते. उपस्थितांकडून त्यांना प्रोत्साहन मिळाल्याने मग त्यांनी वेगवेगळ्या गाण्यावर ठेका धरत नाचण्याचा पुरेपूर आनंदही लुटला. एरवी विरोधकांवर तुटून पडणारे प्रशांत बंब मुलीच्या लग्नात मात्र बेभान होऊन नाचले. त्यांच्या या नृत्याविष्काराची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com