राष्ट्रपतींनी केलेल्या गौरवाने भारावले "आर्मर्ड कोअर'

राष्ट्रपतींनी केलेल्या गौरवाने भारावले "आर्मर्ड कोअर'

नगर : लष्कराच्या नगरमधील आर्मर्ड कोअर सेंटर व स्कूलला (एसीसीएस) आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. "देशाच्या संरक्षणासाठी एसीसीएसची कामगिरी अतुलनीय आहे. या संस्थेचा इतिहास गौरवशाली, देदीप्यमान आहे,'' अशा शब्दांमध्ये त्यांनी गौरव केला. या उच्चतम गौरवाने संपूर्ण केंद्र भारावून गेले. कामगिरीबद्दल सन्मान म्हणून ध्वज प्रदान करण्यात आला. 

श्री. मुखर्जी यांच्या हस्ते "एसीसीएस'चे कमांडंट मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांनी हा सन्मान स्वीकारला. लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. एम. हैरिज, लष्कराच्या प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी, पालकमंत्री राम शिंदे, महापौर सुरेखा कदम, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी अनिल कवडे आदींसह विविध वरिष्ठ लष्करी अधिकारी या वेळी उपस्थित होते. 

या वेळी झालेल्या पथसंचलनाचे नेतृत्व ब्रिगेडिअर संदीप झुंझा यांनी केले. संचलनात लष्कराचे घोडदलातील अश्व, रणगाडा पथक आणि संचलन करणाऱ्या जवांनानी लक्ष वेधून घेतले. संचलनाच्या सुरवातीला "भीष्म' व नंतर "अर्जुन' रणगाडा सहभागी झाला होता. त्यावर सन्मानप्राप्त ध्वज घेऊन कर्नल सुनील राजदेव यांनी शानदार संचलन केले. सुखोई विमान आणि चेतक हेलिकॉप्टरने दिलेली सलामी लक्षवेधी ठरली. डाक विभागामार्फत तयार केलेल्या "फर्स्ट डे कवर'चे अनावरण या वेळी राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. 

ध्वजप्रदान सोहळ्यानंतर राष्ट्रपती मुखर्जी यांनी ट्रेनिंग स्कूल व परिसरातील प्रदर्शनाला भेट दिली. "कवचित कोअर केंद्र' आणि स्कूलला हा सन्मान मॅकेनाईज्ड युद्ध कौशल्य संस्थेच्या अग्रदूतच्या रुपात आपल्या उत्कृष्ट आणि कौतुकास्पद कामगिरीसाठी त्यांनी प्रदान केला. 

देशातील सैनिक आणि मित्रराष्ट्राच्या सैनिकांना उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी ही संस्था जगभर प्रसिद्ध आहे. कवचित कोअरच्या पराक्रमी घोडदळाला साहसपूर्ण कामगिरीसाठी आतापर्यंत दोन व्हिक्‍टोरिया क्रॉस, दोन परमवीर चक्र, 16 महावीर चक्र आणि 52 वीरचक्रांनी सन्मानित करण्यात आले आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com