प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांनी मला भाजपत आणले  - Pramod Mahajan and Gopinath Munde introduced me in BJP | Politics Marathi News - Sarkarnama

प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांनी मला भाजपत आणले 

आमदार मनीषा चौधरी, दहीसर
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

माझे वडील प्रजा समाजवादी पक्षात होते, तरी मी एकीकडे उद्योजक होण्याची धडपड करताना वनवासी कल्याण आश्रमाचे काम करीत होते. स्व. प्रमोद महाजन यांनी मला पूर्णवेळ पक्षाचे काम करण्यास सांगितल्याने २६ वर्षांनी मी आमदार झाले. ठाणे जिल्ह्यातील कम्युनिस्टांची प्रचंड दहशत मोडून काढली. महाजनांची भेट झाली नसती तर मी यशस्वी उद्योजिका झाले असते. 

- आमदार मनीषा चौधरी, भाजप, दहीसर (मुंबई)

माझे वडील भालचंद्र राऊत हे मृणाल गोरे, मोरारजी देसाई, मधू दंडवते, गोदुताई परुळेकर यांच्याबरोबर काम करीत होते. मी उंबरगावला खासगी कंपनीत काम करताना एकीकडे वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आदिवासींची सेवा करीत होते. त्यावेळी १९८८ मध्ये प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांनी माझे कौशल्य पाहून मला पूर्णवेळ पक्षाचे काम करण्यास सांगितले. मी सुशिक्षित शेतकरी व ओबीसी कार्यकर्ती असल्याने त्यांनीच मला पक्षात आणले. 

डहाणू नगरपालिका प्रभाग उपाध्यक्ष हे मला मिळालेले पक्षातील पहिले पद, त्याच नगरपालिकेत १९९५ मध्ये नगरसेविका झाले. दोनच वर्षांनी ध्यानीमनी नसताना व अगदी अचानकपणे नगराध्यक्ष झाले. तेव्हा नगरपालिकेत शिवसेनेचे आठ तर काँग्रेसचे १२ नगरसेवक होते. सपा व अपक्ष प्रत्येकी एक नगरसेवक होते. भाजपकडे माझ्यासह फक्त दोन नगरसेवक होते. 

Image result for manisha chaudhary mla
तेव्हा नगराध्यक्षपद ओबीसींसाठी राखीव होते व शिवसेनेला नगराध्यक्षपद मिळू नये म्हणून काँग्रेसने मला पाठिंबा दिला. मनीषाताईंना नगराध्यक्ष करा, असा प्रस्ताव हितेंद्र ठाकूर, ताराबाई वर्तक यांनी गोपीनाथ मुंडे यांना दिला व त्यामुळे मला नगराध्यक्षपदाचा बहुमान मिळाला. त्यानंतर शिवसेनेने रडीचा डाव खेळून माझ्या जात प्रमाणपत्राला आव्हान दिले, मात्र मी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन ते प्रकरण जिंकले. 

त्यानंतर डहाणू विभाग अध्यक्ष, ठाणे विभाग चिटणीस, महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्ष, दोनदा राज्य उपाध्यक्ष अशी पदे भूषविताना २०१२ मध्ये दहिसरमधून नगरसेविका झाले.

२०१४ च्या निवडणुकीत सेना-भाजप युती तुटली तेव्हा दहिसर विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी स्वीकारण्यास कोणीही तयार नव्हते. समोर शिवसेनेचे विभागप्रमुख, आमदार व बलाढ्य नेते विनोद घोसाळकर असल्याने ही जागा पक्षासाठी क गटातील (विजयाची अजिबात संधी नसलेली) मानली जात होती.

Image result for manisha chaudhary mla
 पण मी ते आव्हान स्वीकारले व प्रभाग समिती अध्यक्षपदावरून केलेली कामे, संघटना कौशल्य व ओबीसी, आगरी, कोळी लोकांच्या सोडवलेल्या समस्या, या बळावर घोसाळकर यांचा पराभव केला. २०१६ मध्ये विधीमंडळाच्या महिला व बालकल्याण समितीचे अध्यक्षपदही मिळाले, २०१९ ला कामाच्या बळावर व जनतेच्या आशिर्वादाने पुन्हा आमदारपद मिळाले. 

१९८९ मध्ये सर्व कागदपत्रे असूनही माझ्या कंपनीच्या परवानगीसाठी पुष्कळ त्रास सहन करावा लागला. तेव्हा आपल्यामागे समर्थ राजकीय पाठबळ हवे हे जाणवले व प्रमोद महाजन यांनी दिलेली संधी स्वीकारायची हे ठरवले. तेव्हा ठाणे जिल्ह्यात जनता दलाचे सामर्थ्य होते तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांमुळे तोच मार्ग निवडला.

Image result for manisha chaudhary mla
 गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर ओबीसींसाठी काम केले व अजूनही त्याच मार्गावर चालते आहे. डहाणूतील आदिवासींसाठी पुष्कळ काम केले, त्यांना उद्योगांमध्ये नोकऱ्या लावल्या. चुकून पाकिस्तानी सागरी हद्दीत गेल्याने तेथील तुरुंगात खितपत पडलेल्या ३६७ आदिवासी मच्छिमारांची चिंतामण वनगांच्या मध्यस्थीने पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींमार्फत सुटका केली.  

मी आदिवासी विभागात भाजपचे व वनवासी कल्याण आश्रमाचे काम करीत असल्याने कम्युनिस्टांचा माझ्यावर प्रचंड राग होता. त्यातूनच त्यांनी २००४ मध्ये माझ्या पतीवर हल्ला केला, त्यांच्या डोक्यावर १६ टाके पडले. मात्र कार्यकर्ते घाबरू नयेत म्हणून तो हल्ला असल्याचे आम्ही जाहीर न करता अपघात असल्याचे सर्वांना सांगितले. 

चिंतामण वनगा खासदार झाले तेव्हाही माझे कार्यालय तोडून लुटण्यात आले. बंगाल-केरळ मध्ये कम्युनिस्टांची दहशत असते तशी त्यांची दहशत तेव्हा ठाणे जिल्ह्यात होती. ते आमची शेतं, बागा, वाड्या नष्ट करीत. पण तरीही न डगमगता त्या विभागातील आदिवासी युवकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचे व्रत मी सुरुच ठेवले.

एकमुखी दत्ताची पूजा करणाऱ्या नागराज बाबांचा विडा घेण्याचा कार्यक्रम आदिवासींमध्ये सुरु केला. यात परस्त्री, सिगरेट, दारू, जुगार आदी पाच गोष्टींचा त्याग करण्याचे व्रत होते. त्यामुळे पुढची तरूण पिढी शिकून आपोआप कम्युनिस्ट विचारसरणीपासून दूर गेली व तेथील हिंसाचाराचा अंत झाला.

(शब्दांकन : कृष्ण जोशी )

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख