राणेंविरुद्ध शिवसेनेने सावंतांची उमेदवारी मागे घ्यावी नाही तर  ...  - Pramod Jathar warns Shivsena on Nitesh Rane issue | Politics Marathi News - Sarkarnama

राणेंविरुद्ध शिवसेनेने सावंतांची उमेदवारी मागे घ्यावी नाही तर  ... 

सरकारनामा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

.

कणकवली : राज्यातील 288 पैकी कणकवली मतदारसंघ वगळता उर्वरित ठिकाणी भाजप, शिवसेनेची युती झालीय. युतीचा धर्म पाळून शिवसेनेने सतीश सावंत यांना दिलेला एबी फॉर्म मागे घ्यावा. तसे न झाल्यास शिवसेनेशी संघर्ष अटळ आहे.

आम्ही युद्धाची ललकारी आधीच दिलीय. त्यामुळे विनाश देखील अटळ आहे. सावंत यांची उमेदवारी मागे न घेतल्यास पुढील संघर्षाबाबतची भूमिका 7 ला जाहीर करू, अशी भूमिका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी जाहीर केली.

येथील भाजप कार्यालयात श्री. जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी रवींद्र शेटे, सुहास सावंत, राजन चिके, अरविंद कुडतरकर आदी उपस्थित होते.

श्री. जठार म्हणाले, "सावंतवाडी, कुडाळ मतदारसंघात आम्ही भाजप उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते. सतीश सावंत यांना शिवसेनेचा एबी फॉर्म मिळाल्यानंतर आम्ही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना याबाबतची माहिती दिली; मात्र शिवसेनेने युती धर्म पाळला नसला तरी भाजप युती धर्म पाळणार आहे. सावंतवाडी, कुडाळमधील उमेदवारांनी भाजपचा एबी फॉर्म जोडू नये, असे स्पष्ट केले. त्यामुळे ऐनवेळी आम्ही आमच्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले नाहीत."

ते पुढे म्हणाले, "अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेना पक्षाने सतीश सावंत यांना दिलेला एबी फॉर्म मागे घ्यावा. किंबहुना, शिवसेना आपल्या उमेदवाराचा एबी फॉर्म मागे घेईल, यावर आमचा अजूनही विश्‍वास आहे; मात्र शिवसेनेने युतीचा धर्म न पाळता, सावंत यांना दिलेली उमेदवारी कायम ठेवली तर शिवसेनेसोबत संघर्ष अटळ असेल; मात्र हा संघर्ष कसा असेल याबाबतची भूमिका आम्ही 7 ऑक्‍टोबरला जाहीर करू."

'त्या' कार्यकर्त्यांची समजूत काढणार
भाजपमधील अनेक नेते व कार्यकर्ते सध्या नाराज आहेत; मात्र सर्व नाराजांची समजूत काढली जाईल. आमदार नीतेश राणे यांना भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उमेदवारी दिली आहे. भाजप नंबर एक बनविण्यासाठीच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बंडखोरांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, असेही आवाहन श्री. जठार यांनी यावेळी केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख