Prakash Solanke makes U turn cancels his resignation | Sarkarnama

प्रकाश सोळंकेंचा 'यू टर्न', आमदारकीचा राजीनामा कॅन्सल 

दत्ता देशमुख 
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

राजकारणाची किळस आली असून राजीनामा देऊन शांततेत जीवन जगणार असल्याचे प्रकाश सोळंके यांनी जाहीर केले होते. मंगळवारी दुपार पर्यंतही राजीनाम्यावर ठाम असल्याचे सोळंके सांगत होते.

बीड : राजकारणाचा किळस आला, त्यामुळे आता बाजूला व्हायचे ठरविले आहे. आमदारकीचा राजीनामा देऊन पुढील आयुष्य शांतपणे जगणार अशी उद्वीग्न भावना व्यक्त करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची किळस एकाच दिवसात दुर झाली. दुपार पर्यंत राजीनामा देणारच असे म्हणणाऱ्या सोळंके यांनी ‘राजीनामा देणार नाही’ असा युटर्न घेतला आहे.

तत्पूर्वी मुंबई येथील राष्ट्रवादी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे आणि सोळंके यांची बंद खोलीत चर्चा झाली आणि सोळंके यांना आलेली राजकीय किळस दुर झाली.

आमदारकीची चौथी टर्म असलेले प्रकाश सोळंके यावेळी माजलगाव मतदार संघातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजयी झाले. त्यांनी आघाडी सरकारमध्ये महसूल, भूकंप व पुनर्वसन, पणन, सहकार अशा खात्यांचे मंत्री म्हणूनही काम केले. त्यामुळे सिनिऑरिटी  आणि अनुभव या जोरावर मंत्रीपद मिळावे अशी प्रकाश सोळंके यांना अपेक्षा होती. मात्र, डावलल्याने सोळंके नाराज होते.

सोमवारी (ता. ३०) सायंकाळीच त्यांनी राजीनामा देण्याची इच्छा थेट बोलून दाखविली होती. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. ३१) मतदार संघातील समर्थकांनी पुणे येथे त्यांची भेट घेऊन त्यांनी राजीनामा देऊ नये अशी विनवणी केली. मात्र, सोळंके राजीनामा देणारच या भूमिकेवर ठाम हेाते.

 दरम्यान, त्यांच्या राजीनामा देण्याच्या भूमिकेची पक्षानेही फारशी दखल घेतली नव्हती अशी माहिती आहे. पण, जिल्ह्यातील एका माजी आमदाराने अजित  पवारांची भेट घेऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पक्ष कार्यालयात काही वेळ सोळंके यांची धनंजय मुंडे व जयंत पाटील यांनी मनधरणी  केली. नंतर काही  वेळाने अजित पवार  तेथे दाखल झाले. त्यानंतर बंद खोलीत काही वेळ झालेल्या बैठकीनंतर ‘राजीनामा देणार नाही’ असा निर्वाळा प्रकाश सोळंके यांनी दिला, असे समजते .   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख