राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी नकोच : प्रकाश आवाडे 

विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष बळकट व्हायचा असेल तर स्वबळावरच सर्व जागा लढवाव्यात असे सांगत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी नकोच असे स्पष्ट केले. हे आपले वैयक्तीक मत असल्याचे सांगून त्यांनी पक्ष घेईल तो निर्णय मान्य असल्याची पुष्टीही यावेळी जोडली.
राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी नकोच : प्रकाश आवाडे 

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष बळकट व्हायचा असेल तर स्वबळावरच सर्व जागा लढवाव्यात असे सांगत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी नकोच असे स्पष्ट केले. हे आपले वैयक्तीक मत असल्याचे सांगून त्यांनी पक्ष घेईल तो निर्णय मान्य असल्याची पुष्टीही यावेळी जोडली. 

कॉंग्रेसच्यावतीने आज जिल्ह्यातील दहाही मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तत्पुर्वी झालेल्या मेळाव्यात आवाडे बोलत होते. ते म्हणाले, "वंचित बहुजन आघाडी कॉंग्रेसलाच 40 जागा सोडणार म्हणत आहे. ही सेटलमेंट कशी होणार ? जनता दल, शेकाप यासारख्या पक्षांकडून जागांची मागणी होत आहे. अशा पक्षांना कुठल्या जागा सोडायच्या आणि कुठल्या सोडायच्या नाहीत हे ठरवावे लागेल. उमेदवारी मिळणार म्हणून कार्यकर्ता पुढे पुढे करतो पण ती मिळाली नाही तर दुसरा विचार करतो.''

"राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीचा अनुभव इथे बसलेल्या सगळ्यांची घेतला आहे. आघाडीत एकसंघपणा रहात नाही. पाडापाडीच जास्त होते. कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे, हे पुन्हा एकदा सिध्द करण्यासाठी या विधानसभा कॉंग्रेसने स्वबळावरच लढवाव्यात. तथापि पक्ष जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असून कॉंग्रेसची सत्ता राज्यात आणण्यासाठी लढायचे आहे सोडायचे नाही.'' असेही ते म्हणाले. 

माजी खासदार जयवंतराव आवळे म्हणाले, "लोकसभा व विधानसभा या वेगवेगळ्या निवडणुका आहेत. लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत, विधानसभेला ताकदीने सामोरे गेले पाहीजे. राज्यात दोन्ही कॉंग्रेसची आघाडी होण्याची शक्‍यता आहे. जास्तीत जागा कॉंग्रेसच्या कशा निवडून येतील हे बघितले पाहीजे.'' 

पक्षाच्या महाराष्ट्र प्रभारी सोनल पटेल म्हणाल्या," लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात कॉंग्रेसचे चिन्ह दिसले नाही. विधानसभेला कुठे ना कुठे पक्षाचे चिन्ह दिसणार आहे. हे चिन्ह घराघरांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी करावा. त्यातून पक्षाचा विचार पुढे नेण्याचाही प्रयत्न व्हावा. विधानसभा निवडणुका ह्या लोकांसमोर जाण्याचा एक मार्ग आहे, त्याचा फायदा पक्षाला कसा होईल हे बघावे.'' 

आमदार आनंदराव पाटील म्हणाले,"दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडीचा निर्णय राज्य पातळीवर होईल. त्या त्या जिल्ह्यातील प्रमुख व पक्षाचे प्रदेश पातळीवरील नेते हा निर्णय एकत्र बसून घेतील. जो निर्णय होईल त्याप्रमाणे कार्यकर्त्यांना काम करावे लागेल.'' यावेळी अजय छाजेड यांचेही भाषण झाले. 

गटतट बाजूला ठेवा-आवळे 
कॉंग्रेसच्या जास्तीत जास्त जागा जिंकायच्या असतील तर तालुका पातळीवर असलेले गटतट बाजूला ठेवले पाहीजेत. त्याची सुरूवात आम्ही हातकणंगलेतून केली आहे. हातकणंगलेत आमचा व आवाडे यांचा एक एकमेकांविरोधात होता. गटतटाच्या राजकारणामुळे पायात पाय घालण्याचा प्रयत्न होतो, त्यातून पाडापाडीचे राजकारण सुरू होते. हातकणंगलेतील ही गटबाजी आम्ही संपवली असून इतर तालुक्‍यातूनही ती हद्दपार झाली पाहीजे, असे परखड मत माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी व्यक्त केले. 

अमरसिंह पाटील यांची उपस्थिती 
2014 ची विधानसभा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर लढलेले माजी जिल्हा परिषद अमर यशवंत पाटील यांनी यावेळी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली. पाटील हे माजी आमदार कै. यशवंत एकनाथ पाटील यांचे सुपुत्र आहेत. पक्षाने उमेदवारी द्यावी किंवा आघाडी करताना सर्वांना विश्‍वासात घेऊन निर्णय घ्यावा असे त्यांनी सांगितले. 

32 पैकी 28 जणांची मुलाखत 
कॉंग्रेसकडून दहा मतदार संघातून 32 उमेदवारांनी प्रदेश कॉंग्रेसकडे अर्ज सादर केला होता. यापैकी 28 जणांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. बाहेरगांवी असल्याने गणपतराव पाटील(शिरोळ), बाजीराव खाडे (उत्तर), उदयानी साळुंखे (करवीर) व दत्ताजी घाटगे (कागल) हे मुलाखतीला उपस्थित राहू शकले नाहीत. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com