आमदार हाळवणकर हेच वस्त्रोद्योगाच्या दयनयीन अवस्थेला जबाबदार : प्रकाश आवाडे 

..
prakash_aawade.
prakash_aawade.

दहा वर्षांत इचलकरंजी शहराची प्रचंड अधोगती झाली. शहरावर अवलंबून असणाऱ्या आसपासच्या खेड्यांवर त्याचा मोठा परिणाम झाला. विद्यमान आमदारांनी शहराच्या विकासाकडे अत्यंत दुर्लक्ष केल्याने त्याचे परिणाम लाखो मतदारांना आणि जनतेला भोगावे लागत आहेत. इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असणारा आणि शहराला पुन्हा ऊर्जितावस्था आणणारा नेता म्हणून जनतेची माझ्याकडे नजर आहे. म्हणूनच यावेळची निवडणूक नक्कीच परिवर्तनीय असल्याचे माजी मंत्री आणि अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे यांनी सांगितले. 

* तुम्ही यावेळी अपक्ष म्हणून का निर्णय घेतला ? 
- इचलकरंजी मतदारसंघ हा वस्त्रोद्योगावर अवलंबून आहे. या उद्योगाला फटका बसला की चहाच्या टपरीपासून ते उद्योगाच्या आर्थिक व्यवहारापर्यंत परिणाम होतो. या उद्योगातील चक्रे फिरण्याचे बंद झाले. त्याचा परिणाम कामगारांपासून सर्वसामान्य नागरिक ते उद्योजक, व्यापाऱ्यांपर्यंत झाला आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांना समर्थ नेतृत्व हवे होते. विविध पक्षांतील नागरिकांनाही एक स्वतंत्र उमेदवार गरजेचा होता. जो उमेदवार शहराचा संपूर्ण अभ्यास असणारा असावा, अशी त्यांची मागणी होती. हे लक्षात घेऊन आणि प्रत्येक घटकाला आपलासा वाटावा, असा उमेदवार म्हणून माझ्याकडे पाहत होते. पक्षाचा बॅनर विकासामध्ये आड येऊ नये, यासाठी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे शहराचा विकास हेच माझे ध्येय आहे. 

* आयजीएम रुग्णालयाबाबत काय वाटते ? 
- इचलकरंजी शहर हे कष्टकऱ्यांचे शहर आहे. शहर आणि परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्याची सुविधा मिळावी, यासाठी पालिकेने आयजीएम रुग्णालय उभे केले. वीस वर्षे हे रुग्णालय नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना सेवा देत होते. आमदार सुरेश हाळवणकर यांनी तीन वर्षांपूर्वी हे रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित केले व रुग्णालयाची अवस्था बकाल करून ठेवली. आज रुग्णालयात रुग्ण लांबच, मात्र कुत्र्यांचा वावरच अधिक असल्याचे चित्र अनेकांना पहावयास मिळते. 

* वस्त्रोद्योगाला अवकळा आली, त्यास कारणीभूत कोण वाटते ? 
- आमदार हाळवणकर हेच वस्त्रोद्योगाच्या दयनयीन अवस्थेला जबाबदार आहेत. शहरातील तब्बल 40 हजार यंत्रमाग भंगारामध्ये गेले आहेत. दहा वर्षांत नवीन योजना दूरच, मात्र असलेल्या योजनाही बंद केल्या आहेत. वीज दरात सवलत नाही, अनुदान वेळेवर नाही, या व्यवसायाला गती मिळण्यासाठी आवश्‍यक तो पाठपुरावा नाही. यापूर्वी आपण 23 कलम पॅकेजमधून इचलकरंजीच्या यंत्रमाग उद्योगाला संजीवनी दिली होती आणि त्यातून देशातील अग्रेसर केंद्र म्हणून इचलकरंजीचा नावलौकिक झाला होता. आता मात्र याच शहराची अवस्था दयनीय झाली आहे. मी केवळ योजना नाही, तर कृतिशील धोरण आखून या शहराच्या विकासाला यापुढे चालना देणार आहे. 

* वारणा पाणी योजनेबाबत आपणास काय वाटते ? 
मी आमदार असताना वारणा पाणी योजनेबाबत आग्रह धरला होता. त्यावेळी हाळवणकर यांनी या योजनेला विरोध करून आपण थेट काळम्मावाडीतून पाणी आणू, अशी घोषणा केली होती. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून डीपीआर तयार केला. मात्र, शासनाने ही योजना फेटाळली. मी कमी खर्चाचा आणि कुंभोज येथून उद्‌भवन क्षेत्र धरून प्रस्ताव दिला होता. मात्र, हीच वारणा योजना दानोळी येथून राबविण्याचा निर्णय हाळवणकर यांनी घेतला. त्यांनी तेथील नागरिकांना दुखावून आपणच या योजनेचे विरोधक तयार केले आणि शहराला शुद्ध, मुबलक पाण्यापासून वंचित ठेवले आहे. या विषयात हाळवणकर राजकीय खेळी करत लोकांच्या भावनेशी खेळ करत आहेत. 

* आपले मतदारसंघासाठी व्हिजन काय आहे ? 
शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. 107 कोटींच्या रस्त्यांची कामे झाली आहेत, अशी वल्गना करणारे आमदार नागरिकांची फसवणूक करत आहेत. शहराचा वस्त्रोद्योग व्यवसाय पूर्ववत आणून इचलकरंजीचे नाव देशात एक नंबरला आणणे, आयजीएम सर्व सुविधायुक्त साकारणे, स्वच्छ, मुबलक पाणी पुरविणे, यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणे, भौतिकदृष्ट्या रस्ते, स्वच्छता याबाबतीत शहर आधुनिक करणे हे आपले स्वप्न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com