prakash ambedkar-supports-chhagan-bhujbal | Sarkarnama

छगन भुजबळ स्वत: नाशिकमधून लढले तर वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 20 जानेवारी 2019

ओबीसींचे नेते छगन भुजबळ हे स्वत: नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असतील तर वंचित बहुजन आघाडी त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही. भुजबळांना आमचा संपुर्ण पाठिंबा असेल असा शब्द प्रकाश आंबेडकरांच्या वतीने औरंगाबादेत झालेल्या वंचित बहुजन आघाडी आणि छगन भुजबळ यांच्या बैठकीत देण्यात आला. 

औरंगाबादः ओबीसींचे नेते छगन भुजबळ हे स्वत: नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असतील तर वंचित बहुजन आघाडी त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही. भुजबळांना आमचा संपुर्ण पाठिंबा असेल असा शब्द प्रकाश आंबेडकरांच्या वतीने औरंगाबादेत झालेल्या वंचित बहुजन आघाडी आणि छगन भुजबळ यांच्या बैठकीत देण्यात आला. 

राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांसोबत आज (ता.20) औरंगाबादेत बंद दाराआड चर्चा झाली. कॉंग्रेस आघाडीच्या वतीने छगन भुजबळ यांच्यावर वंचित आघाडीशी बोलणी करण्याची जबाबदारी टाकण्यात आल्याच्या चर्चेमुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु बैठकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी वंचित बहुजनच्या आघाडी संदर्भात कुठलीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

छगन भुजबळ यांच्या सोबत झालेल्या बैठकीस भारिपचे नेते माजी आमदार हरिभाऊ भदे, आमदार बाळासाहेब सिरसकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव अमित भुईगळ, प्रा. किसन चव्हाण उपस्थित होते. या बैठकीतील चर्चेचा सगळा तपशील त्यांनी उघड केला नसला तरी छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेसाठी आमचा पाठिंबा असेल असे त्यांनी जाहीर केले. भुजबळ यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीने उमेदवार दिला, तर मग मात्र वंचित बहुजन आघाडी आपला स्वतंत्र उमेदवार नाशिकमधून देईल असेही वंचित आघाडीने स्पष्ट केले आहे. 

भुजबळांना उध्दवस्त करण्याचे षडयंत्र 
ओबीसींचे नेते असलेल्या छगन भुजबळ यांना राज्यातील मनुवादी सरकारने उध्दवस्त करण्याचे षडयंत्र आखले होते. राजकीय सूड उगवण्यासाठीच त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. अशा प्रकारचे गुन्हे इतर राजकीय नेत्यांवर दाखल असतांना केवळ भूजबळांवरच कारवाई करण्यात आली. यामागे त्यांचे राजकीय व सामाजिक जीवन उध्दवस्त करण्याचा सरकारचा डाव होता. 

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर व छगन भुजबळ यांच्यात नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात भेट झाली होती. त्यानंतर आंबेडकरांच्या सूचनेनूसार औरंगाबादेत ही बैठक पार पडल्याचेही वंचित आघाडीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख