राज ठाकरेंपेक्षा भाजप का नको?: प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादीचे १० आमदार सोबत, काँग्रेसचे भेटून गेले
राज ठाकरेंपेक्षा भाजप का नको?: प्रकाश आंबेडकर

अकोला : देशाची फाळणी झाली तेव्हा दिलेला हिस्सा हा पाकिस्तानचा होता. येथे राहिलेला मुस्लिम हा भारतीय आहे. घटनेने त्यांना भारतीय असल्याचा अधिकार दिला आहे. भाजप किंवा संघाने येथील मुस्लिमांना हिणावण्याचे काम करू नये, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

भाजप नेते माधव भंडारी यांनी केलेल्या व्यक्तव्यावरआंबेडकर म्हणाले की, १९४७ मध्ये सर्वच गोष्टीची फाळणी झाली. तिजोरीचीही वाटणी झाली. त्यातून पाकिस्तानाला वाटा मिळाला. येथे राहिलेला मुस्लिम हा भारतीय असून, त्याचा येथील प्रत्येक गोष्टीवर बरोबरीचा वाटा असल्याचे ते म्हणाले. त्यांनी एमआयएमला सोबत घेवून लोकसभा निवडणूक लढविण्याच्या नफ्या-तोट्याबाबत बोलताना सांगितले की, औरंगाबाद वगळता मुस्लिम आमच्यासोबत राहिले नाही. विधानसभेच्या वेळी मात्र परिस्थिती बदलेल,असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. विधानसभेसाठी आघाडी करण्यावरून त्यांनी ‘नरो वा कुंजरोवा’ची भूमिका घेतली. 

लोकसभा निवडणुकीच्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी वंचित बहूजन आघाडीसोबत येण्याचे आमंत्रण दिले होते; परंतु त्यांनी काँग्रेस आघाडीला प्राधान्य दिले. आता विधानसभा निवडणुकी त्यांना आमच्यासोबत यायचे असेल, तर त्या बाबतचा निर्णय त्यांनी घ्यावा, असे वंचित बहूजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे सांगितले.

विधानसभेसाठी नव्या आघाडीबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशावेळी मनसेचे राज ठाकरे यांना सोबत घेणार का, या प्रश्‍नाला उत्तर देताना आंबेडकर यांनी राज ठाकरेंपेक्षा भाजप का नको, असा प्रतिप्रश्‍न उपस्थित करून राज ठाकरे यांच्यासोबत आघाडीची शक्यता फेटाळून लावली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे १० आमदार वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असून, काँग्रेसचे एक माजी आमदार मंगळवारी सकाळीच भेटून गेल्याची चर्चा आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी फार काही बोलण्याचा टाळले असले तरी जे सोबत येण्यास तयार असतील त्यांच्यासोबत चर्चा करू, असे सांगितले. त्यासाठी ७ जूनपर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.         

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com