Prakash Ambedkar Criticizes Congress and BJP | Sarkarnama

एकमेकांच्या भानगडी बाहेर न काढण्याचा समझोता झाला : काँग्रेस - भाजपवर आंबेडकरांची टीका

मनोज भोईगडे
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

 मुख्यमंत्री त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे लपवितात. काँग्रेस अध्यक्षांसह किती नेत्यांवर ४२० चे गुन्हे दाखल झाले आहेत, ते पुढे येत नाही. यावरून दोघांनीही एकमेकांच्या भानगडी बाहेर न काढण्याचा समझोता केला आहे, असा प्रश्‍न उपस्थित करून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात सत्ताधारी भाजपसह काँग्रेसवरही टीका केली.  

अकोला :  मुख्यमंत्री त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे लपवितात. काँग्रेस अध्यक्षांसह किती नेत्यांवर ४२० चे गुन्हे दाखल झाले आहेत, ते पुढे येत नाही. यावरून दोघांनीही एकमेकांच्या भानगडी बाहेर न काढण्याचा समझोता केला आहे, असा प्रश्‍न उपस्थित करून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात सत्ताधारी भाजपसह काँग्रेसवरही टीका केली.  

नागपूर येथील दीक्षा भूमीवर विजयादशमीच्या दिवशी धम्मचक्र परिवर्तन दिनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अकोला येथे दुसऱ्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन केले जाते. भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने अकोला क्रिकेट क्लबवर बुधवारी आयोजित या सोहळ्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी समाजबांधवांना संदेश देताना देशातील व राज्यातील स्थितीसाठी सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्ष जबाबदार असल्याची टीका करतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही प्रहार केला. 

"आरएसएसचा एक कार्यकर्ता सरसंघचालक मोहन भागवतांचे नावे घेवून त्यांच्यावर देशात घडवून आणलेल्या बाॅम्ब स्फोटाचा आरोप करतो आणि या देशातील व्यवस्था त्याची साधी चौकशीही करीत नाही. यावरून या देशातील एकूण परिस्थिती किती गंभीर आहे, हे लक्षात येते. बँका बुडत आहे. मंदीची तीव्रता वाढत आहे. आणखी किती परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर येथील सर्वसामान्य माणूस जागा होईल," असा प्रश्नही आंबेडकर यांनी उपस्थित केला. 

''या देशातील सर्व सामान्यांच्या ठेवी बँकेत सुरक्षित नाहीत. कापूस आयात करून देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे धोरण हे सरकार राबवित आहे. हे सर्व घडतेय ते या देशातील विरोधक संपवल्यामुळे. परिस्थिती बदलायची असेल, मंदीतून बाहेर पडायचे असेल तर येथील विरोधक जिवंत असला पाहिजे. सर्वच येथे लुटारू आहेत. त्यामुळे सावध करण्याचे काम मी करतो, काय करायचे ते तुम्ही ठरवा,"असे सांगून त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधकांना बळ देण्याचे आवाहन जनतेला केले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासंघाचे अध्यक्ष पी.जे. वानखडे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये भंते बी. संघपाल, यु.जी. बोराडे, जिजाऊंचे वंशज नामदेवराव जाधव, प्रा. अंजलीताई आंबेडकर, सोहेल आंबेडकर आदी प्रमुख होते. प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासंघाचे उपाध्यक्ष एस.पी. वानखडे यांनी केले तर संचालन प्रा. एम.आर. इंगळे यांनी केले.  

मुख्यमंत्र्यांना आव्हान
गुजरातच्या पोरबंदर येथील बंदरावर अमेरिकेतून आलेल्या कापसाच्या गाठी उतरल्या. चार हजार रुपये क्विंटलने जिनिंग केलेला कापूस या देशात आला. आणखी कापूस येणार आहे. अशा वेळी या देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून वेड लागलेला व्यापारीच हमी भावाने कापूस घेईल. ३५०० रुपायांच्या वर कापसाचे दर जाणार नाही. उत्पादनाचा खर्चही निघणार नाही. हे मान्य न करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंचावर आव्हान देण्याची माझी तयारी असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.    

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख