prakash-ambedkar-attracting-crowds-willing-candidates-also | Sarkarnama

प्रकाश आंबेडकरांकडे गर्दी वाढली कार्यकर्त्यांची आणि इच्छुकांचीही !

अरूण जैन
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

प्रकाश आंबेडकर यांच्या सभा - कार्यक्रमांना गेल्या ५- ६ महिन्यात गर्दी वाढू लागली आहे  हे कालच बुलडाण्यात झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या संवाद यात्रेवरून दिसून आले.

बुलडाणा  : प्रकाश आंबेडकर यांच्या सभा - कार्यक्रमांना गेल्या ५- ६ महिन्यात गर्दी वाढू लागली आहे  हे कालच बुलडाण्यात झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या संवाद यात्रेवरून दिसून आले. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांकडे एकीकडे   कार्यकर्त्यांची गर्दी वाढली  आहे   आणि इच्छुकांचीही . 

निवडणुका जवळ आल्या की सर्वच पक्ष जागृत होतात. तसे भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकरही अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यात काही गैरही नाही. त्यांनी लक्ष्मण माने, महात्मा फुलेंच्या वंशज निताताई होले, माजी आमदार विजय मोरे, प्रा. श्याम मुडे आदिंना एकत्रित करून वंचित बहुजन आघाडी स्थापन केली.   या समाजांची मोट बांधून राज्याच्या राजकारणात आपला प्रभाव वाढविण्याची मोर्चेबांधणी ऍड. बाळासाहेब आंबेडकर करीत आहेत .येत्या  लोकसभा - विधानसभा निवडणुकीत भारिप - बहुजन महासंघाची ताकद वाढविण्यासाठी त्यांनी बर्जरचे राजकारण सुरु केले आहे . 

बुलडाण्यातच कार्यक्रम घेण्याचे कारण असे, की अकोला, वाशिममध्ये भारिपचा ब-यापैकी जम बसलेला  आहे. बुलडाण्यातही त्यांनी गेल्यावेळी नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत मुस्लीम उमेदवाराला संधी देऊन दलित, मुस्लीम व इतर समर्थक असा पॅटर्न राबवून यशस्वी केला. त्यामुळे अनेकांना अचानक भारिप प्रेमाचे भरते आले आहे. 

कालच्या कार्यक्रमात इच्छुकांची पुढे -पुढे करण्याची घाई पाहून हे स्पष्ट होते. मात्र आलेला समुदाय मात्र अॅड. आंबेडकर यांनी वंचितांना जोडण्याच्या भूमिकेच्या समर्थनार्थ आलेला होता. त्याला मतांमध्ये परिवर्तीत करण्यासाठी आणखी बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. परंतु गर्दीने हुरळून जाणारांना आतापासूनच विधानसभेची दिवास्वप्ने पडू लागली आहेत. परंतू मैदान अजून दूर आहे अन् बाळासाहेब वकीलही आहेत, हे विसरून कसे चालेल!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख