अकोल्यात "व्होट बॅंक' मजबूत करण्यासाठी भारिप-बमसंची मोर्चेबांधणी

अकोल्यात "व्होट बॅंक' मजबूत करण्यासाठी भारिप-बमसंची मोर्चेबांधणी

अकोला : नगरपालिका, महापालिका निवडणुकांमध्ये दारुण पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारिप-बमसंने पक्षात आलेली मरगळ दूर करीत नव्याने पक्षबांधणी सुरू केली आहे. भारिप-बमसंचे सत्ताकेंद्र असलेल्या अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुका लक्षात घेता पक्षपातळीवर नव्याने व्युहरचना करत ग्रामीण भागात "व्होट बॅंक' मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी कामाला लागले आहेत. 

बहुजन, मागासवर्गीयांच्या चळवळीत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारा भारिप-बमसंचा "अकोला पॅटर्न' अकोल्यातच अडचणीत आला आहे. जिल्ह्यात पक्ष संघटनेत काही नेत्यांचा एककल्ली कारभार, तिकीट वाटपात झालेली मनमानी आणि त्यातूनच कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषामुळे नगरपालिका, महापालिका निवडणुकीत भारिप-बमसंच्या अनेक मात्तबर उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाची कारणमीमांसा करीत पक्ष नेतृत्वाने अनेकांची कानउघाडणी करीत गटबाजी बंद करण्याचा अल्टीमेटम्‌ दिला होता. 

त्यानंतर काही महिने पक्षात कुरघोडीचे राजकारण करणारे पदाधिकारी शांत होत पक्ष कार्यात तल्लीन झाले. जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुका लक्षात घेता रखडलेल्या योजना मार्गी लावण्यासाठी भारिप-बमसंने तीन सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीच्या सुचनेनुसार जिल्हा परिषदेच्या रखडलेल्या योजना मार्गी लावत ग्रामीण भागातील जनतेला योजनांचा लाभ देत आपली "व्होट बॅंक' मजबूत करण्याचा प्रयत्न भारिप-बमसंकडून करण्यात येत आहे. 

हे करीत असताना ग्रामीण भागात पक्षसंघटन अधिक मजबूत करीत नव्याने मोर्चेबांधणी करण्यावर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भर दिला आहे. त्याअनुषंगानेच अनेक तालुक्‍यातील गावो-गावी फिरून भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, जिल्हा कार्याध्यक्ष काशिराम साबळे, माजी राज्यमंत्री डॉ. दशरत भांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकूंद भिरड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमीरउल्ला खॉन, राजुमिया देशमुख, ज्ञानेश्वर सुलताने, प्रदिप वानखडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांकडून नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची मोट बांधत सर्कलनिहाय कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात येत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com