prakash ambedkar | Sarkarnama

मोदींकडून डॉ. आंबेडकरांचा ढाल म्हणून वापर : प्रकाश आंबेडकर 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 एप्रिल 2017

मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून स्मारक, कार्यक्रम, ऍपच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाशी जोडले जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. डॉ. आंबेडकरांचे नातू आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी मात्र यावर टीका केली आहे. 

पुणे : व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणारे लोकच सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उदोउदो करीत आहेत. टीकाकारांविरुद्ध लढण्यासाठी हे लोक डॉ. आंबेडकर यांचा ढाल म्हणून वापर करत आहेत, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली. 

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती कार्यक्रमाच्या समारोपानिमित्त "आंबेडकरांची पत्रकारिता आणि सद्य:स्थिती' या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, ""डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. ते हळूहळू पुढे येत आहेत.
सामाजिक, सांस्कृतिक विकासासाठी त्यांनी केलेल्या लिखाणावर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. खुलेपणाच्या भूमिकेवर त्यांचा जोर होता. व्यक्तिस्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. पण काही लोक स्वतः:च्या बचावासाठी डॉ. आंबेडकरांच्या नावाचा वापर करत आहेत. सध्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा कार्यक्रम
काही लोकांकडून सुरू आहे, म्हणून त्यांच्यावर टीका होत आहे. या टिकेपासून बचाव व्हावा, म्हणून हे लोक डॉ. आंबेडकरांचा उदोउदो करत आहेत. व्यक्तिस्वातंत्र्याचीभूमिका मांडणाऱ्या आंबेडकरांचे नाव घेतले की झाले, असे त्यांना वाटत असावे.'' पाकिस्तान, चीनचा विषय असो की भाषेचा मुद्दा डॉ. आंबेडकरांनी या विषयावर सखोल मांडणी केली आहे. त्या-त्या वेळी यासंबंधीचे दृष्टिकोन पुढे येत राहतील, असेही आंबेडकर म्हणाले. 

सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे म्हणाले, ""डॉ. आंबेडकरांनी उपेक्षित, वंचित घटकांसाठी पत्रकारिता केली. समाजव्यवस्थेत दुय्यम वागणूक मिळत असलेल्या लोकांसाठी लढा दिला. ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पत्रकार होते.'' विचारवंत प्रा. प्रतिमा परदेशी म्हणाल्या,""डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता सत्यशोधक
परंपरेतील होती. पुनरुज्जीवनवादी पत्रकारितेला त्यांनी आव्हान देवून उपेक्षितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.'' पत्रकार संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे, सरचिटणीस अजय कांबळे यावेळी उपस्थित होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख