prajakta tanpure on ajit pawars phonecall | Sarkarnama

अजित पवारांचे लक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर : तनपुरे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

घाटावरच्या गावांवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे, असे सांगून आमदार तनपुरे यांनी भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना चिमटा काढला. कारण घाटावरची गावे कर्डिले यांच्या अधिपत्याखालील समजली जातात.  

नगर : राज्यात सत्ता स्थापनेबाबत काय व्हायचे ते होईल, परंतु आम्ही राष्ट्रवादीचे आमदार जनतेचे प्रश्न सोडविण्यात मश्गुल आहोत. अजितदादांचा फोन करून 'पंचनामे व्यवस्थित होतात की नाही' यावर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. मोठ्या राजकीय घडामोडी होत असतानाही त्यांचे लक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर आहे, असे माहिती राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

पिकांच्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यानंतर आज त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी पत्रकारांशी बोलताना आमदार तनपुरे म्हणाले, मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. बुऱ्हाणनगरसह चाळीस गावांची पाणी योजना, मिरी-तिसगावची पाणी योजना, रस्त्यांचे प्रश्न आहेत. अत्यल्प कालावधीत दुरूस्त केलेले रस्ते पुन्हा लगेचच खराब होत आहेत. त्याची सविस्तर आकडेवारी पाहून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करणार आहे. बुऱ्हाणनगरसह चाळीस गावांच्या पाणीयोजनेतील तृटी दूर करून ही योजना कार्यान्वित होण्यासाठी लवकरच संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेणार आहे. 

विधानसभेतून विजयानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बाहेर पडलो आहे. एकही दिवस थांबलो नाही. रोज कुठे ना कुठे दौरा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून लगेचच पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख