Pradip Jaiswal Chandrakant Khaire Helping Needy | Sarkarnama

खैरे -जयस्वाल गरजूंसाठी सरसावले 

जगदीश पानसरे 
शनिवार, 4 एप्रिल 2020

औरंगाबादच्या राजकारणामध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि आमदार प्रदीप जयस्वाल यांची मैत्री सर्वश्रुत आहे. कोरोनाच्या संकटकाळात गोरगरिबांच्या मदतीला धावून जाण्यासाठी हे दोघे पुन्हा एकदा हातात हात घालून काम करताना दिसत आहेत

औरंगाबाद :  औरंगाबादच्या राजकारणामध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि आमदार प्रदीप जयस्वाल यांची मैत्री सर्वश्रुत आहे. कोरोनाच्या संकटकाळात गोरगरिबांच्या मदतीला धावून जाण्यासाठी हे दोघे पुन्हा एकदा हातात हात घालून काम करताना दिसत आहेत.

देशात लॉकडाऊनची घोषणा होऊन नऊ दिवस उलटले आहेत. या दरम्यान, गोरगरीब, गरजूंना अन्न पाकीट, अन्नधान्य व दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवण्यासाठी हजारो हात पुढे आले आहेत.  राजकीय पक्षासोबतच विविध सामाजिक संघटना, संस्था आणि अगदी गल्लीतील मित्रमंडळ यांनी देखील पुढाकार घेतला. मात्र गरजूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी शिवसेना व त्या पक्षाचे नेते तरी मागे कसे राहतील .

दोन दिवसांपूर्वी सरकारनामाशी बोलताना 'प्रदीप जयस्वाल' यांनी आपल्याला सर्वाधिक फोन हे जेवणाची व्यवस्था करावी यासाठी येत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर खैरे आणि जयस्वाल यांनी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि परिचितांकडून धान्य व दैनंदिन गरजेच्या वस्तू गोळा करण्यास सुरुवात केली होती. क्रांती चौक येथील जयस्वाल यांच्या खाऊ गल्ली या हॉटेलात हे धान्य व दैनंदिन वस्तू पॅकिंग करण्याचे काम सुरू होते. विशेष म्हणजे जयस्वाल आणि खैरे यांच्या देखरेखीखाली हे काम केले गेले. दोघांनीही अगदी काळजीपूर्वक प्रत्येक किटमध्ये गरजेचे सामान, वस्तू टाकल्या जात आहेत की नाही, यावर बारकाईने लक्ष दिले. शहरातील पाच हजार गरजूंना हे किट पुरवण्याचे काम देखील सुरू झाले आहे.''

औरंगाबादच्या राजकारणात प्रदीप जयस्वाल यांचा  प्रवास नगरसेवक, महापौर,आमदार, खासदार असा राहिला आहे. तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे दोन वेळा आमदार ,मंत्री तर सलग चारवेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला असला, तरी संघटनेच्या कामात आणि जनतेच्या संकटात धावून जाण्याचे त्यांनी सोडले नाही .

अगदी कोरोनाच्या संकटातून सुटका व्हावी यासाठी दौलताबाद येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिरात त्यांनी तीन दिवस सप्तशतीचे पाठ व होमहवन करत देवाचा धावाही केला. जयस्वाल व खैरे यांच्या राजकीय कारकीर्दीत दोघांची एकमेकांना नेहमीच साथ मिळत राहीली. पस्तीस -चाळीस वर्षापासून त्यांच्या या राजकीय मैत्रीमध्ये अपवाद वगळता कधीही दुरावा आला नाही. आज लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या जिल्ह्यातील अनेक कष्टकरी,गरजू , मजूर व गरिबांची उपासमार होत आहे. अशावेळी  80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीवर वाटचाल करत खैरे आणि जयस्वाल पुन्हा एकदा हातात हात घालून जनतेच्या मदतीला सरसावल्याचे चित्र आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख