Pradeep jaiswal waited for Kishanchand Tanwani | Sarkarnama

अखेर तनवाणी यांची गळाभेट घेऊनच जैस्वाल परतले !

जगदीश पानसरे 
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

कधीकाळी शिवसेना या एकाच पक्षातून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे कालांतराने विधानसभा निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढले, हरले. पण मैत्रीआड राजकारण येऊ द्यायचे नाही ही खूण गाठ मनाशी बांधून हाकेला धावून जाण्याचा निर्धार दोघांनीही केला.

औरंगाबादः शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल व भाजप शहर-जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांची मैत्री राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे.

तनवाणी यांचा वाढदिवस असल्याने प्रदीप जैस्वाल दुपारी शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले. बाहेर असलेले तनवाणी येईपर्यंत मग सव्वातास मित्राची वाट पाहत जैस्वाल तिथेच थांबून होते. अखेर तनवाणी आल्यानंतर गळाभेट घेऊन आणि त्यांचे तोंड गोड करूनच जैस्वाल परतले. 

कधीकाळी शिवसेना या एकाच पक्षातून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे कालांतराने विधानसभा निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढले, हरले. पण मैत्रीआड राजकारण येऊ द्यायचे नाही ही खूण गाठ मनाशी बांधून हाकेला धावून जाण्याचा निर्धार दोघांनीही केला. जैस्वाल आणि तनवाणी औरंगाबादच्या राजकारणातील प्रसिध्द जोडी. गुलमंडीवरील व्यापारामुळे या दोघांच्या कुटुंबात मैत्रीपुर्ण संबंध होते. पुढे रोजच्या भेटीगाठी आणि व्यवसायाच्या निमित्ताने दोघांची जवळीक वाढली. 

अगदी विद्यार्थी दशेपासून दोघांचे एकमेकांच्या घरी जाणे-येणे असल्यामुळे तनवाणी-जैस्वाल सच्चे दोस्त बनले. कालांतराने उद्योग सांभाळतच दोघेही शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आले आणि संघटनेतील विविध पदांसोबतच आमदार, खासदारही झाले. 

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपचे फाटले पण तनवाणी-जैस्वाल यांच्यातील मैत्रीचे धागे मात्र मजबुत होते. शिवसेनेला जय महाराष्ट्र करत तनवाणी भाजपमध्ये दाखल झाले आणि प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधातच विधानसभा निवडणुकीत उभे ठाकले. परिणाम दोघांचाही पराभव आणि एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा विजय. 

निवडणुकीतील पराभवामुळे या दोघांची मने दुभंगणार आणि त्यांच्या मैत्रीत 'दरार' येणार असा अंदाज लावला जात होता. पण तो जैस्वाल-तनवाणी यांनी फोल ठरवला. अगदी दुसऱ्याच दिवशी एकमेकांची भेट घेऊन त्यांनी सगळ्यांनाच चकीत केले होते. 

गेल्या चार वर्षापासून वेगळ्या पक्षात असले तरी तनवाणी-जैस्वाल यांची मैत्री आणि कौटुंबिक संबंध कायम आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 2014 च्या रिप्लेचा अनुभव येण्याची दाट शक्‍यता आहे. दोघांनीही जोरदार तयारी सुरू केली असली तरी मैत्रीआड राजकारण न आणण्याचा शिरस्ता ही जोडी पाळणार हे जैस्वाल यांनी दाखवून दिले आहे. 

किशनचंद तनवाणी यांचा आज (ता.11) वाढदिवस असल्याने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळपासूनच तनवाणी यांना शुभेच्छा देणाऱ्यांनी गर्दी केली होती. दुपारी पाऊणच्या सुमारास प्रदीप जैस्वाल गुलमंडीवरील तनवाणी यांच्या संपर्क कार्यालयात भलामोठा पुष्पगुच्छ घेऊन आले. 

तेव्हा तनवाणी वाढदिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी बाहेर होते. प्रदीप जैस्वाल शुभेच्छा देण्यासाठी आल्याचे कळाले तरी तनवाणी यांना कार्यालयात यायला एक ते सव्वा तास लागला. पण तोपर्यंत जैस्वाल कार्यालयात बसूनच होते. अखेर दोन वाजता धावत पळत तनवाणींनी कार्यालय गाठले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आतुर असलेल्या आपल्या मित्राला मिठी मारली. 

जैस्वाल यांनी नेहमीप्रमाणे तनवाणींच्या पाठीवर थाप मारत, पेढा भरवला. दोघांमध्ये थोडावेळा गप्पा झाल्या आणि जैस्वालांनी त्यांचा निरोप घेतला. वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या तनवाणी-जैस्वाल भेटीने त्यांचे समर्थक मात्र हुरळून गेले होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख