ते मिश्‍किलपणाने उद्‌गारले, अरे प्रदीप, लग्नात उभा राहिलो असतो तर किती आहेर मिळाला असता ?

ते मिश्‍किलपणाने उद्‌गारले, अरे प्रदीप, लग्नात उभा राहिलो असतो तर किती आहेर मिळाला असता ?

औरंगाबाद : शिवसैनिकांवर जीवापाड प्रेम करणारे, कधी कठोर तर कधी मिश्‍किलपणे कोटी करून हसायला लावणारे बाळासाहेब. औरंगाबाद दौऱ्यातील त्यांचा तो प्रसंग आजही आठवतो. स्वतंत्र फोटो काढण्याची शिवसैनिकांची मागणी किंवा हट्ट म्हणा बाळासाहेबांनी पुरवला आणि तब्बल दीडशे शिवसैनिकांना सोबत फोटो काढू दिले. छायाचित्रांचा कार्यक्रम उरकल्यानंतर मात्र मला शेजारी बोलावून बाळासाहेबांनी जी मिश्‍किल टिप्पणी केली ते ऐकून त्यांच्यांतील व्यंगचित्रकाराचे मला तेव्हा दर्शन घडले. 

बाळासाहेबांचे या शहरावर नेहमीच प्रेम राहिले आहे, त्यामुळे त्यांच्या सानिध्यात राहण्याचा मला अनेकदा योग आला. त्यातून बाळासाहेबांच्या स्वभावातील विविध पैलुचे दर्शन झाले. तीन मिनिटात मला दिलेली लोकसभेची उमेदवारी यातून त्यांच्या झटपट निर्णयाची झलक त्यावेळी पहायला मिळाली. मातोश्रीवर उमेदवारी मागयला गेलो, साहेबांच्या पाया पडलो आणि डोळ्यातून आपुसक पाण्याच्या धारा लागल्या. साहेबांनी विचारले प्रदीप तू का रडतोयस, मी म्हणालो, साहेब माझ्या सारख्या सामान्य माणसाला तुम्ही उमेदवारी दिली असे म्हणताच त्यांनी माझ्या पाठीवर थाप देत, जा विजयी होऊन परत ये असा आशिर्वाद दिला. महापौर, खासदार, आमदार अशी अनेक पद बाळासाहेबांनी मला दिली. कधी माझ्या जातीचा विचार केला नाही, जीवापाड प्रेम दिलं आणि त्यामुळेच आज मी इथवर पोहचलो. 

बाळासाहेबांच्या मिश्‍किल स्वभावाचा अनुभव मला औरंगाबाद येथील त्यांच्या दौऱ्यात आला. साहेब हॉटेलात थांबले होते. नेते, पदाधिकारी, भेटून गेल्यानंतर हॉटेलच्या रुममध्ये मी, साहेब आणि थापा तिघंच होतो. बाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी माझ्याकडे आग्रह धरला, की आम्हाला साहेबांसोबत स्वतंत्र फोटो काढायचायं. मी साहेबांकडे गेलो, त्यांना म्हणालो, साहेब बाहेर काही शिवसैनिक आले आहेत, त्यांना तुमच्या बरोबर स्वतंत्र फोटो काढायचायं. साहेब म्हणाले, किती शिवसैनिक आहेत, मी म्हणालो, साहेब 25-30. अरे मग ग्रुप फोटो काढूयात ना, पण साहेब त्यांना स्वतंत्रच फोटो काढायचा आहे असे म्हटल्यावर साहेब म्हणाले, ठीक आहे फोटोग्राफरला सांग जास्त वेळ लावायचा नाही, पटकन फोटो काढायचे. 

फोटो काढायला साहेबांनी परवानगी दिल्याने मी खूष झालो, धावत लॉबीमध्ये गेलो आणि शिवसैनिकांना फोटो काढण्यासाठी बोलावून आणले, एक - एक असे तब्बल दीडशे शिवसैनिकांनी साहेबांसोबत फोटो काढले. तासभर साहेब उभे होते. फोटो काढून झाले, शिवसैनिक निघून गेले, मग साहेबांनी मला बोलावून घेतले, म्हणाले, प्रदीप अरे एवढा वेळ जर मी लग्नात उभा राहिलो असतो, तर मला किती आहेर मिळाला असता ' त्यांच्या या कोटीने उपस्थित सगळ्यांनाच हसू फुटले. साहेबांचा हा मिश्‍किल स्वभाव माझ्या कायम लक्षात राहिला. 

( शब्दांकन : जगदीश पानसरे ) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com