अरेरावीची भाषा करणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल: प्रभाकर देशमुख 

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. आमच्यासमोर महाराजांचा आदर्श आहे. जातीपातीचे राजकारण आम्ही कधी केले नाही अन करणार नाही याची साक्षीदार येथील जनता आहे. त्यामुळे स्वतः जातीपातीचे राजकारण करुन जनतेची दिशाभूल करणार्यांचा कावा जनतेने ओळखला आहे.- प्रभाकर देशमुख,
prabhakar_deshmukh
prabhakar_deshmukh

दहिवडी  : आपल्याला पालिका निवडणूकीत मते दिली नाहीत म्हणून म्हसवडकरांना उरमोडीचे पाणी देणार नाही असे म्हणणे हे चांगल्या लोकप्रतिनिधीचे लक्षण नाही असा टोला अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांनी माजी आमदार जयकुमार गोरे यांना लगावला. तसेच ही विधानसभेची निवडणूक माण-खटावच्या जनतेसाठी अस्तित्वाची, सन्मानाची व स्वाभिमानाची  निवडणूक असून येथील जनतेला भयमुक्त करण्यासाठीची निवडणूक असल्याचेही त्यांनी सांगितले.

म्हसवड येथील राजवाडयात अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्या प्रचारार्थ युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी नगराध्यक्ष श्रीमंत अजितराव राजेमाने, युवा नेते मनोज पोळ, प्रा.विश्वंभर बाबर, दिलीप तुपे, बबनदादा विरकर, बाळासाहेब माने, तेजसिंह राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, गोरख शिर्के आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


प्रभाकर देशमुख म्हणाले, या शहरातील माय माऊली पेठेतुन व गावातून दहशतीखाली वावरताना येथील जनतेने पाहिले आहे व अनुभवले आहे. या शहरातील जनतेने गुंडगिरी अनुभवली आहे. अनेक तरुण पोलिस व कोर्ट कचेर्यांच्या चक्रात अडकून त्यांच्या आयुष्याची फरफट झालेली सगळ्यांनी बघितले आहे. जेष्ठांचा अपमान व अवहेलना आपण सहन केली. या सर्वांचा कडेलोट झाला व त्यामुळे मागील पालिका निवडणूकीत सर्वांनी एकत्रित येत सत्तांतर घडविले. पालिकेत परिवर्तन घडवून शहरात शांतता प्रस्थापित करण्यात यश मिळवले. सर्वसामान्य जनता पेटून उठली व एकत्र झाली तर काय घडू शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे.


प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले, अफाट बौद्धिक क्षमता असतानाही शैक्षणिक सुविधा अभावी आपली मुले मागे राहिली ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. विविध क्रिडा प्रकारात चमक दाखवण्याची ताकद, क्षमता, गुणवत्ता असतानाही भौतिक सविधा न मिळाल्याने अनेक खेळाडू उत्कृष्ट कामगिरी पासून वंचित राहिले. शासनाने माण तालुक्यात क्रिडा संकूल मंजूर केले असूनही लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे याचे काम कित्येक वर्षांपासून रखडलेले आहे. येथील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे. २०१४ मध्येच माजी आमदारांनी घोषणा केली होती कि जिहे-कटापूरचे पाणी येत्या दोन वर्षात माण नदीत खळाळेल. अन या निवडणूकीतही ते हेच सांगत आहे. त्यामुळे आजवर फसवणूकीशिवाय येथील जनतेला लोकप्रतिनिधीकडून काही मिळाले नाही. शाश्वत विकास, कायमस्वरुपी पाणी या सोबतच माणची संस्कृती टिकवण्यासाठी हि निवडणूक आहे.


प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले, अरेरावीची भाषा किती दिवस जनतेने ऐकायची? अशी भाषा करणाऱ्यांना आता जनताच दाखवेल की तुमची जागा कोठे आहे. आजपर्यंत सगळे दिवे पाहिले आहेत. आता जे काही करायचे आहे ते माण-खटावच्या जनतेसाठी, तरुणांच्या भवितव्यासाठी, माणच्या विकासासाठी. युवकांनो तुम्ही पुढील दहा दिवस मला द्या पुढची पाच वर्षे मी तुमची सेवा करण्यासाठी देतो अशी ग्वाही देशमुख यांनी दिली.

"पराभव समोर दिसत असल्यामुळे माझी बदनामी करण्याचा विरोधकांनी प्रयत्न सुरु केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माझ्याबद्दल तक्रार करुन काहीही साध्य झाले नाही. या दोघांनी विरोधकांच्या तक्रारीत काही तथ्य नसल्याचे सांगितले आहे. माझी संपत्ती शासनाच्या वेबसाईटवर आहे. ती सर्वांना पाहण्यासाठी खुली आहे.  माझ्याकडे नित्तीमता आहे अन माणला वेगळ्या उंचीवर न्यायचं आहे. त्यामुळे विरोधकांनी रडीचे डाव खेळणे बंद करावे," असेही प्रभाकर देशमुख म्हणाले . 
या युवा मेळाव्यास श्रीमंत भैयासाहेब राजेमाने युथ फौंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेसह शहरातील जेष्ठ मंडळी, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थितीत होता.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com