power comes and go with one rain says sharad pawar | Sarkarnama

शरद पवारही म्हणाले, एका पावसाने सत्ता येते आणि जाते....

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

...

सांगली : सत्तेची फार काळजी करू नका. एका पावसाने सत्ता येते नी जाते. खानापूर विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी आम्ही सदाशिवराव पाटील यांच्या पाठीशी राहू, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.

खानापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. पवार यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार सुमनताई पाटील, विट्याच्या नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, रावसाहेब पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले,"मला खानापूर मतदार संघाने पहिल्यापासून साथ दिली आहे. खानापूरचे हणमंतराव पाटील आमदार असतानाच या मतदार संघाशी माझे नाते जुळले. मध्यंतरीच्या काळात सदाशिवराव पाटील पक्षात नव्हते, तरीही ते कधी पक्षात नसल्याचे जाणवले नाहीत. आम्ही त्यांना आमचेच मानायचो. भागात पाणी नसतानाही परदेशातही द्राक्ष, डाळिंब निर्यात केली आहे. येथील गलाई व्यावसायिक देशभरात स्थायिक झालेत. संकटावर मात कशी करायची हे या मतदारसंघातील लोकांना चांगले माहिती आहे. तुमचा मतदार संघाच्या विकासात उद्दिष्ट माझ्या समोर आहे. सत्तेची चिंता करू नका, लोकांवर विश्‍वास ठेवा. एका पावसाने सत्ता येते अन्‌ जाते.''

शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी भर साताऱ्यात पावसात प्रचाससभा घेतली होती. या सभेमुळे अनेक समीकरण बदलली. या सभेचा परिणाम एवढा झाला की भाजपचे उमेदवार असलेले छत्रपती उदयनराजे यांचा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाला. या सभेचे सर्वत्र पडसाद पडले. राष्ट्रवादीची पश्चिम महाराष्ट्रात लाट आहे. त्यामुळे पवार यांनी केलेला पावसाचा उल्लेख अनेकांच्या भुवया उंचावून गेला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख