Poonam Mahajan tweets :I know you are together now ! | Sarkarnama

मला माहिती आहे, आता तुम्ही दोघे एकत्र आहात : पूनम महाजन 

सरकारनामा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

आता अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर पृथ्वीवर ताटातूट झालेले गुरू-शिष्य स्वर्गात एकत्र आले असावेत ,असेच पूनम महाजन यांनी या ट्विटमधून ध्वनित केले आहे.

पुणे :  भाजपचे ज्येष्ठ नेते कै. प्रमोद महाजन यांच्या कन्या खासदार पूनम महाजन यांनी एक भावस्पर्शी ट्‌विट केले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर केलेल्या या ट्‌विटमध्ये श्री. वाजपेयी आणि श्री. प्रमोद महाजन यांचे एकत्रित दिलखुलास हास्यविनोद करतानाचे  छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, 'मला माहिती आहे आता तुम्ही दोघे एकत्र आहात.'

भाजप खासदार पूनम महाजन यांनी व्यक्त केलेल्या भावना बोलक्‍या आहेत. प्रमोद महाजन आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे नाते गुरू-शिष्याचे होते. प्रारंभीच्या काळात प्रमोद महाजन यांच्यावर कट्टर अडवानी समर्थक असा ठसा होता. अडवानी यांच्या रथयात्रेचे नियोजन करण्यात प्रमोद महाजन आघाडीवर होते. परंतु नंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्याही ते जवळ गेले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली 1996 मध्ये केंद्रात भाजपचे सरकार आले होते. या तेरा दिवसांच्या सरकारमध्ये प्रमोद महाजन संरक्षणमंत्री होते.

त्यानंतर वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले. वाजपेयींच्या नेतृत्वाखालील मंडळात प्रमोद महाजन यांनी संसदीय कामकाज, माहिती व प्रसारण आणि दूरसंचार अशा महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार सांभाळला होता. वाजपेयी सरकारला ममता बॅनर्जी आणि जयललिता यांच्यामुळे अस्थिरतेचा सामना करावा लागत होता. त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस आणि प्रमोद महाजन हे वाजपेयींचे ट्रबल शूटर म्हणून ओळखले जात असत.

विरोधी पक्षांशी आणि सोनिया गांधी यांच्याशी प्रमोद महाजन त्या काळात थेट संपर्क राखून असत. प्रमोद महाजन हे वाजपेयींना पितृतुल्य मानत असत. एप्रिल 2006 मध्ये प्रमोद महाजन अत्यवस्थ असताना वाजपेयी मुंबईला येऊन त्यांना पाहून गेले होते. प्रमोद महाजन यांच्या अकाली मृत्यूचे त्यांना खूप दुःखही झाले होते. त्यामुळे आता अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर पृथ्वीवर ताटातूट झालेले गुरू-शिष्य स्वर्गात एकत्र आले असावेत असेच पूनम महाजन यांनी या ट्विटमधून ध्वनित केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख