पूजा मोरे : शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्य असूनही बनल्या "स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्या!  - pooja more gewrai | Politics Marathi News - Sarkarnama

पूजा मोरे : शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्य असूनही बनल्या "स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्या! 

सरकारनामा ब्युराे
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

मी शिवसेनेतच आहे. माझी राजकीय भूमिका शिवसेनेशी बांधिल असून मी केवळ शेतकरी प्रश्नांवर लढण्यासाठी खा. राजू शेट्टी यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम करणार आहे. 
-पूजा मोरे 
पंचायत समिती सदस्या, गेवराई. 

बीड : शाळा- महाविद्यालयातच सामाजिक जाण असणाऱ्या पूजा मोरेंना पंचायत समिती लढण्याची संधी मिळाली. कमी वयात शिवसेनेच्या माध्यमातून पंचायत समितीत पाऊल ठेवणाऱ्या पूजा मोरे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या लढ्यात उतरल्या आहेत. एकाचवेळी शिवसेना व स्वाभिमानी असे दुहेरी धनुष्य त्या कशा पेलतात? याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष आहे. 

मिरगाव (ता. गेवराई) येथील शेतकरी कुटुंबातील पूजा मोरेंचे बालपण, शिक्षण औरंगाबादेत झाले. शिक्षण काळात त्यांनी टेनिस व कबड्डीचा छंद जोपासत स्पर्धांमध्ये मैदानही मारले; पण आपल्या खेळाचा त्यांनी शिक्षणावर परिरणाम होऊ दिला नाही. म्हणूनच तंत्रशिक्षण पदविका आणि अभियांत्रिकी पदवी त्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. 

दरम्यानच त्यांच्या अभियांत्रिकीची शेवटच्या सत्रातील परीक्षा देणे बाकी असतानाच राजकीय फडात उडी घेतली. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी अंतरवली गणातून निवडणूक लढविणाऱ्या पूजा मोरे चांगल्या मतांनी गेवराई पंचायत समितीच्या सभागृहात पोहोचल्या. एकीकडे राजकीय फड सर केल्यानंतर त्यांनी राहिलेली अंतिम परीक्षाही चांगल्या गुणांसह उत्तीर्ण होत अभियांत्रिकीची पदवी हातात घेतली. शैक्षणिक पदव्या, खेळाचे कसब, राजकीय पद हातात असलेल्या पूजा मोरेंकडे वक्तृत्वाचे कौशल्यही दांडगे आहे. त्याचाच लाभ त्यांना पंचायत समितीच्या निवडणुकीच्या विजयात झाला. दरम्यान, शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पूजा यांना शेतकजयांच्या प्रश्नांची चाड आहेच. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न खा. राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना मांडत असल्याचे त्यांनी हेरले. आपण शिवसेनेतून विजयी झालेलो असलो तरी शेतकरी प्रश्नाला योग्य न्याय देता येत नसल्याची सल त्यांना होती. त्यामुळे शेतकरी प्रश्न स्वाभिमानाने तडीस नेण्यासाठी त्यांनी खा. शेट्टींच्या व्यासपीठावर हजेरी लावली. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना शिवसेनेचा स्वाभिमान दुखावणार नाही याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख