विश्वजित पूरग्रस्तांच्या मदतीला; बाकिचे लाडोबा कुठे, असे विचारल्याने बेदम मारहाण

विश्वजित पूरग्रस्तांच्या मदतीला; बाकिचे लाडोबा कुठे, असे विचारल्याने बेदम मारहाण

पुणे : महापुरात मदत करण्यावरून सांगलीतील राजकारण पुण्यात पोचले आहे. पुरातील मदतकार्यावरून राजकीय टीका केल्याचा राग आल्याने पलूस येथून पुण्यात आलेल्या पाच जणांनी एका तरुणाचे कारमधून अपहरण करून बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

गुरुप्रसाद दिलीप लाड, जगदीश निवास लाड, सुरज संजय लाड, संदीप लाड, आशुतोष जयवंत लाड (सर्व रा. कुंडल, ता. पलूस, सांगली) यांच्यावर मारहाण, अपहरण याचा गुन्हा दाखल केला आहे. आदित्य उर्फ अतुल उत्तम लाड ( रा. कोथरूड) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी आदित्य आणि आरोपी हे एकाच गावचे असून, ते ऐकमेकांच्या ओळखीचे आहेत. पलूस भागात महापुर आल्यानंतर तेथील स्थानिक आमदार डॉ. विश्वजित कदम हे नागरिकांच्या मदतीला धावून गेले होते. त्यावरून आदित्य लाड यांनी त्यांच्या गावाकडील 'लाड सरकार' आणि 'एल ग्रुप' यासह इतर वॉट्‌सऍप ग्रुपवर "पुरातील जनतेला आमदार साहेब मदत करतात, बाकीचे लाडोबा कुठे गेले? स्वतःचे लाड करायला वगैरे" अशी पोस्ट टाकली.

याचा राग मनात धरून आरोपींनी आदित्य लाड यांना फोन करून धमकावले होते. मंगळवारी हे पाचही आरोपी पांढऱ्या रंगाच्या कारमधून कोथरूड येथील आदित्य यांच्या घरी आले. त्यांना कारमध्ये जबरदस्तीने बसवून साधारण दीड किलोमीटर लांब पौडफाटा येथून केळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोरे श्रमिक वसाहत येथे नेले. "तु बदनामी करणारा मेसेज का टाकला आहे, " असे म्हणत लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. टायरच्या रबरी ट्यूबने पाठीवर, तोंडावर फटके मारले. त्यानंतर पुन्हा घराजवळच्या चौकात आणून सोडले. "तू गावाकडे येऊन आमच्या पाया पडून माफी मागायची नाहीतर तुला मारून टाकू" अशी धमकी देऊन निघून गेले. 

आदित्य लाड यांनी यासंदर्भात कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी हे पुण्यात नोकरी करतात. आरोपींना अटक करण्यासाठी पथक रवाना झाले आहे, असे पोलिस निरीक्षक (गुन्हे) एस. एस. खटके यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com