अंधारात केले जातेय राखेचे प्रदूषण : पारस औष्णिक विद्युत केंद्र परिसरात जीव गुदमरतोय

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी नियमित दरमहा औष्णिक विद्युत केंद्रात भेट देत असतात. प्रकाराची पाहणी करून निश्चित कारवाई केली जाईल.- राहुल मोटे (नियंत्रण अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ)* औष्णिक विद्युत केंद्रामार्फत होणाऱ्या प्रदूषणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीत तक्रार केली होती. शिवाय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही निवेदन दिले होते. मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही.- संतोष दांदळे, माजी सरपंच
अंधारात केले जातेय राखेचे प्रदूषण : पारस औष्णिक विद्युत केंद्र परिसरात जीव गुदमरतोय

अकोला - पारसच्या औष्णिक विद्युत केंद्राच्या दोन थर्मल पॉवर प्लांटमधून निघणाऱ्या फ्लाय ॲशमुळे (राख) परिसरातील दहा ते बारा गावातील १५ हजार नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अंधारात ‘अर्थ’कारणासाठी 'ईएसपी' सिस्टिम काही तासांसाठी बंद ठेवून यंत्रणेकडूनच राखेचे प्रदूषण केले जात आहे. तर, सरपंच संघटनेने तक्रार करूनही त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळासह जिल्हा प्रशासनानेही कानाडोळा करीत आपल्या अकार्यक्षमतेचा पुरावा दिला आहे.

पारसच्या औष्णिक विद्युत केंद्राअंतर्गत दोन थर्मल पॉवर प्लांट चालवले जातात. विद्युत निर्मिती प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात 'फ्लाय ॲश' बाहेर पडत असते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी इलेक्ट्रो स्टॅटीक पेसीपेटर (इएसपी कंट्रोल सिस्टिम) यंत्रणा कार्यान्वित आहे. या राखेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी 'ॲश हॅंडलींग प्लांट' विभागाकडे आहे. ईएसपी सिस्टिम सुरूच ठेवायला पाहिजे, असा नियम आहे. मात्र लॉगबुकवर यंत्रणा सुरूच दाखवून दर एका तासाने मात्र यंत्रणा काही मिनिटांसाठी बंद करण्यात येते. अशाप्रकारे ८० मिनिट मशिन बंद ठेवून प्रशासनाची तर दिशाभूल केली जातच आहे, शिवाय नागरिकांच्या जीवाशीही खेळ सुरू आहे.

दिवसा धूर दिसून येतो. त्यामुळे रात्री अंधाराचा फायदा घेवून हा प्रकार केला जात आहे. फ्लाय अॅश आणि दुर्गंधीयुक्त पाण्याने परिसरात मोठ्या प्रमाणात वायू व जलप्रदूषण होते आहे. नागरिकांच्या आरोग्याशिवाय शेतीवर सुद्धा दुरगामी परिणाम झाला आहे. दमा, कॅन्सर, तत्वारोगासारखे गंभीर आजार नागरिकांमध्ये बळावले आहेत. शिवाय नदी, नाल्यामध्ये मिसळणाऱ्या दुषित पाण्याने भुगर्भातही प्रदुषण होते आहे. या सर्व प्रकाराबाबत नागरिकांनी जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळासह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई तर सोडाच साधी चौकशी देखील करण्याचे सौजन्य अधिकाऱ्यांनी दाखवले नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

या गावांना धोका

पारस, धानोरा, जोगलखेड, मनारखेड, कोळासा, सातरगाव, कसुरा यासह इतर गावांना धोका निर्माण झाला आहे.

सरपंच संघटनेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष

पारस येथील माजी सरपंच संतोष दांदळे यांच्या नेतृत्वात परिसरातील सरपंचांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे तक्रार केली होती. याशिवाय त्यांनी कार्यकारी अभियंत्याची सुध्दा भेट घेवून प्रकार लक्षात आणून दिला होता. मात्र, या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.

निवासस्थाने भक्ष्यस्थानी!

औष्णिक विद्युत केंद्र परिसरात काही महिन्यापूर्वीच निवासस्थाने बांधण्यात आली. ही निवासस्थाने भक्ष्यस्थानी सापडली आहेत. याठिकाणी २४ इमारती असून, यामध्ये २६४ क्वॉर्टर्स आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com