शरद पवारांना आम्ही स्वस्थ बसू देणारच नाही: उध्दव ठाकरे 

शरद पवारांना आम्ही स्वस्थ बसू देणारच नाही: उध्दव ठाकरे 

औरंगाबाद : राज्यातून भाजप-शिवसेनेला घालवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं शरद पवार सांगतायेत, हो तुम्ही स्वस्थ बसू नका, आम्हीही तुम्हाला स्वस्थ बसू देणारच नाही असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शरद पवारांना लगावला. 

तुमचा सरकार पाडण्या दांडगा अनुभव या महाराष्ट्राने, देशाने पाहिला आहे. वसंतदादा, अटलबिहारी वाजपेयी यांची सरकार पाडून तुम्ही ते दाखवून दिले. तुम्ही किती विघ्नसंतोषी आहात हे राज्यातील जनतेला माहित आहे, आणि म्हणून आम्ही तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही अशा शब्दांत उध्दव ठाकरे यांनी शरद पवारांच्या टिकेला उत्तर दिले. 

औरंगाबाद येथे शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाकरे यांच्या जाहीरसभेचे आयोजन मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, अतुल सावे, प्रशांत बंब हे उमेदवार उपस्थित होते. 

ठाकरे म्हणाले, मी संभाजीनगरात आलो की औरंगाबादेत हेच मला कळत नाही. लोकसभा निवडणुकीत तुमच्याकडून चूक झाली म्हणून आम्हाला गाडण्याची भाषा करणाऱ्यांच्या सात हजार पिढ्या उतरल्या तरी भगवा खाली उतरवू शकणार नाहीत. आता पुन्हा अशी चूक होऊ देऊ नका, गाफील राहू नका. 

चुकलो तर कान पकडण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण शिक्षा म्हणून जर तुम्ही शिवसेनेला मतदान केले नसेल तर त्याचा फरक आम्हाला तर पडतोच, पण तुमच्या येणाऱ्या पिढीला देखील तो पडेल. कन्नडच्या त्या विश्‍वासघात्याने हिरव्याची साथ दिली, त्याला मी कदापी माफ करणार नाही. पाच वर्षात त्याच्या चुका पोटात घातल्या, पण भगव्याशी हरामखोरी खपवून घेणार नाही असे म्हणत ठाकरे यांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा समाचार घेतला. 

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार या विधानावर अजित पवार यांनी "पाच वर्ष काय केले' या टिकेला देखील ठाकरे यांनी पाच वर्ष आम्ही तुमचे चाळे पाहत होतो अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले. रडतात, भेटतात, गायब होतात ? काय नाटकं चालू आहेत ? असा चिमटा देखील त्यांनी यावेळी काढला. आधीच्या कॉंग्रेस नेत्यांकडे पाहून मान आदराने खाली झुकायची, पण आजचे नेते पाहून शरमेने मान खाली जाते, त्यामुळे मी कॉंग्रेसवर फार बोलणार नाही असे म्हणत त्यांनी खिल्ली उडवली. 

समान नागरी कायदा करा.. 

आम्ही भाजपशी युती केल्यामुळे अनेकांना पोटसुळ उठला आहे, आमच्यावर कॉंग्रेसकडून टिका केली जातेय. भाजपने जाहीरनाम्यात 370 कलम रद्द करण्याचा शब्द पाळला, मग आम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा नाही, तर मग याला विरोध करणाऱ्यांना द्यायचा का? आता देशात समान नागरी कायदा लागू करून या हिरव्या नागोबांची नागपंचमी पाकिस्तानात साजरी होऊ द्या असेही ठाकरे म्हणाले. 

दहा रूपयात शिवभोजन योजना महाराष्ट्रात सुरू करणार, गरिबांसाठी एका रुपयात आरोग्य तपासणी, तीनशे युनिट पर्यंत घरगुती वापराच्या वीजदरात 30 टक्के सुट, पंधरा लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार या आश्‍वासनांचा पुनरुच्चार देखील उध्दव ठाकरे यांनी सभेत केला. 
 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com