राजकीय आरोप प्रत्यारोप होत रहातील ;पण प्रकल्पग्रस्तांचे काय झाले ?

राजकीय आरोप प्रत्यारोप होत रहातील पण आजच्या आरोपाच्यामुळाशी असलेला प्रकल्पग्रस्तांचा प्रश्‍न फार मोठा आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात होणाऱ्या प्रकल्पांची संख्या प्रचंड असल्याने राज्यातील विस्थापितांची संख्या मोठी आहे असे बोलून दाखवत.प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन हा राज्यासमोरची महत्वाची समस्या असल्याचेही ते मान्य करत असत.
chavan-Nirupam-Fadnvis
chavan-Nirupam-Fadnvis

प्रकल्पग्रस्त आणि त्यांचे पुनर्वसन हा विकासाची स्वप्ने पहाणाऱ्या प्रत्येक देशासमोरचा यक्षप्रश्‍न. नाणारच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी इंचभर जागा देणार नाही म्हणणारे शेतकरी हे आजचे वास्तव तर दशकांपूर्वीच्या कोयना प्रकल्पासाठी विस्थापित झालेले हाही आजचाच विषय.

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आक्रमक झालेल्या कॉंग्रेसने नवी मुंबईतील भूखंडाचे विक्री प्रकरण समोर आणले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संबंधात सडतोड उत्तर देत न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे.या मुददयावर वातावरण तापत ठेवण्याची तयारी कॉंग्रेसने केलेली दिसते आहे.

नवी मुंबई परिसरातील जमीन सिडकोने अधिग्रहणासाठी मागितली असताना तिचे परस्पर व्यवहार कसे झाले ? त्यात कोणाला लाभ झाला? भाजपमधील काही मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळिक असल्याचे चित्र निर्माण करून व्यवसायवाढीचे प्रयत्न करणाऱ्या काहीजणांनी यात हात धुवून घेतले काय ? असे अनेक प्रश्‍न आहेत.असे व्यवहार सरकार कुणाचेही असले तरी होतात हे सर्वविदित पण दुर्दैवी सत्य. निवडणुकीच्या वर्षात भाजपच्या सर्व व्यवहारांकडे लक्ष ठेवण्याचा निर्णय कॉंग्रेस किंवा अन्य विरोधी पक्षांनी घेतला तर ते त्यांच्या भुमिकेला अनुसरूनच असेल. पारदर्शी व्यवहाराचा आग्रह धरणाऱ्या, तसेच वर्तन ठेवणाऱ्या फडणवीसांना संशयाच्या भोवऱ्यात खेचणे विरोधकांचे लक्ष्य असेल.

आपल्या जवळ कोण वावरते आहे ,त्यांचे हेतू काय आहेत याचे भान राज्यकर्त्यांना सदासर्वकाळ ठेवावे लागते.सत्तेबरोबर येणारी संस्कृती चिंताजनक असते. राजकीय गरजेसाठी काहीजणांना अपरिहार्यपणे समवेत घ्यावे लागत असेल तर त्यांचा लाभ किती अन नुकसान किती याचे कोष्टक कुठल्याही राजकारण्याप्रमाणे फडणवीसांनाही ठेवावे लागेल.राज्याच्या कारभारात गुणात्मक बदल करून दाखवणे हे त्यांच्यासमोरचे आव्हान आहे तसेच अवतीभवतीच्या मंडळींकडे लक्ष ठेवणेही.असो.

या चर्चेपेक्षाही महत्वाचा आहे तो वेगळाच विषय. राजकीय आरोप प्रत्यारोप होत रहातील पण आजच्या आरोपाच्या मुळाशी असलेला प्रकल्पग्रस्तांचा प्रश्‍न फार मोठा आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात होणाऱ्या प्रकल्पांची संख्या प्रचंड असल्याने राज्यातील विस्थापितांची संख्या मोठी आहे असे बोलून दाखवत.प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन हा राज्यासमोरची महत्वाची समस्या असल्याचेही ते मान्य करत असत.

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. सामाजिक क्षेत्रात पथदर्शी ठरणारे अनेक कायदे महाराष्ट्रात तयार झाले अन ते देशाने स्वीकारले.प्रकल्पग्रस्तांना न्याय देणारा 1999 चा कायदा असेल किंवा 2002 साली त्यात केलेले बदल : सरकारची भूमिका कायम बाधितांना न्याय देणारी आहे.मेधाताई पाटकर यांनी पुकारलेल्या नर्मदा आंदोलनामुळे पुनर्वसनाच्या कायदयात अनेक बदल झाले.त्यांच्या हटटीपणामागे असलेली बाधितांबददलची कळकळ ही अनेक निर्णयांना जन्म देणारी ठरली.प्रकल्पांना विरोध करून चालणार नाही पण समाजाच्या प्रगतीसाठी त्याग करणाऱ्या मूठभरांना न्याय हा मिळालाच पाहिजे.

सिडको ,नवी मुंबई , संजय निरूपम,पृथ्वीराज चव्हाण , देवेंद्र फडणवीस या परिघात चर्चा फिरत ठेवण्याऐवजी वादाच्या मुळाशी असलेल्या प्रकल्पग्रस्तांचे काय यावर विचार होणे आवश्‍यकआहे.

आज राज्यात धरणे ,रस्ते ,अभयारण्ये ,विमानतळे अशा विविध प्रकल्पांमुळे विस्थापित झालेली 50 लाख कुटुंबे असावीत असा अंदाज आहे. सामना या गाजलेल्या चित्रपटात स्व. विजय तेंडुलकरांनी लिहिलेला एक खटकेबाज संवादआहे , श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्यातला. कारखान्याची भव्यता डॉ.लागू दाखवत असतात तेंव्हा निळू फुले चेहऱ्यावरची रेषही हलू न देता प्रश्‍न करतात, इथे जे छोटे छोटे शेतकरी असतील ते कुठे गेले ? त्यांचे काय झाले ? अंगावर काटा आणणाऱ्या या प्रश्‍नातील अर्थगर्भता आजही संपलेली नाही.मारूती कांबळेचे काय झाले हा सामनाचित्रपटातला सवाल.असे लक्षावधी
मारुती कांबळे आजही आहेत.

पं.नेहरू भाक्रानांगलची योजना देशाला समर्पित करताना ही आधुनिक भारताची तीर्थक्षेत्रे आहेत असे म्हणाले होते. कोयना हेही त्याच मालिकेतले धरण.शेतीसाठी पाणी देणारे शिवाय विजनिर्मिती करणारे.1956 ते 1962 या काळात या धरणाचे बांधकाम झाले. त्यानंतर विस्तार होत राहिला पण 62 साली बांधल्या गेलेल्या या प्रकल्पातील विस्थापितांचे अदयाप पुनर्वसन झाले नाही हे वास्तव धक्‍कादायक आहे अन चिंताजनकही.

नवी मुंबई असो किंवा चिपी दिघीसारख्या जागांवर उभे रहाणारी विमानतळे. प्रकल्पग्रस्त आंदोलने करत असतात ,भाव मागत असतात.विदर्भात तर गोसीखुर्द सारखा प्रकल्प या समस्येमुळे अडला. आधी पुनर्वसन मग प्रकल्प सारखी धोरणे आखली तर गेली पण भुसंपादनाचे निवाडे करण्यासाठी अधिकारीच नाहीत अशी स्थिती झाली. नोकरशाहीची गजगती ही देशातील भयावह समस्या ,त्याचा फटका पुनर्वसनालाही बसला.शिवाय ही समस्या इथेच संपत नाही.

कोयनेतील प्रकल्पबाधितांना ठाणे जिल्हयात जागा मिळाली.बरे झाले पण ती जागा विकत घेणारे बडे मासेही लगेचच तेथे पोहोचले.जागा कुणाला विकायची हा त्या लाभार्थ्याचा हक्‍क असला तरी अशी जागा मिळवून देण्यासाठी काही व्यावसायिक प्रयत्न करतात अन नंतर ती जागा गिळंकृतही करतात.कॉंग्रेसच्या काळात असे किमान 200 व्यवहार झाल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. असे व्यवहार आजही होत आहेत .

व्यवस्थेत नोकरशहा .बांधकाम व्यावसायिक परस्पर संगनमताने असे व्यवहार करतात हे उघड आहे.नेत्यांच्या इस्टेटी हा सार्वजनिक चचेंचा विषय होतो पण अधिकाऱ्यांना मात्र कुणी जाब विचारायचा प्रश्‍नच उदभवत नाही. कल्याणकारी राज्याने पुनर्वसनाला असा वेळ का लागतो याचे उत्तर शोधले पाहिजे.लॅण्ड शार्क या गरिब लाभार्थ्यांपासून दूर रहातील असे वातावरण निर्माण केले पाहिजे.

प्रकल्पग्रस्तांना प्रचलित दराने मोबदला देणारा कायदा या सरकारने केला आहे.पुनर्वसनासाठी राज्यमंत्री दर्जाचे पदही निर्माण केलेआहे. ही संपूर्ण प्रक्रिया गतीमान होईल याकडे लक्ष पुरवणे आवश्‍यक आहे. पानशेत पूरग्रस्त हा विषय नव्या पिढीला कळणार नाही.पण कोयनेचे
प्रकल्पग्रस्त मात्र नव्या संदर्भात गाजत रहातील.

हे योग्य नाही. प्रगतीच्या पाउलखुणा ठरणाऱ्या प्रकल्पांसाठी त्याग करणाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. आरोपप्रत्यारोपा पलिकडे जावून राजकारणी याकडे लक्ष देतील ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com