political yatra away fram pimpri chinchwad | Sarkarnama

राजकीय यात्रांची पिंपरी-चिंचवडकडे पाठच

उत्तम कुटे
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

पुण्यात आज सायंकळी येणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पिंपरी-चिंचवडला न येता तशीच पुढे जाणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे विधानसभेचे इच्छूक व त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. 

पिंपरीः पुण्यात आज सायंकळी येणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पिंपरी-चिंचवडला न येता तशीच पुढे जाणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे विधानसभेचे इच्छूक व त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. 

महाजनादेशप्रमाणे राष्ट्र्वादीच्या शिवस्वराज्य व शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंच्या जनआशिर्वाद यात्रेचेही नियोजन पक्के न झाल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहर राजकीय यात्रांपासून वंचितच राहणार आहे.

महाजनादेश शहरात येत नसल्याची भरपाई विधानसभेला मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराची सभा शहरात घेऊन केली जाणार आहे, असे भाजपचे शहर सरचिटणीस व प्रवक्ते अमोल थोरात यांनी सांगितले. 

शहरात तीनपैकी चिंचवड मतदारसंघात पक्षाचा आमदार असून भोसरीत सहयोगी सदस्य आहेत. या दोन्ही जागा पक्ष लढणार आहे. तर, पिंपरी या तिसऱ्या ठिकाणी युतीतील मित्रपक्ष शिवसेनेचे आमदार आहेत. दरम्यान,युती होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर महाजनादेश यात्रा शहरात अपेक्षित होती, असे पक्षाचा एक पदाधिकारी म्हणाला. त्यामुळे मनोधैर्य वाढून युती झाली नाही, तर शहरात शत, प्रतिशत भाजप करण्याच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आणखी बळ मिळाले असते, असे त्यांनी सांगितले. 

या यात्रेची सांगता १९ तारखेला नाशिक येथे होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी आचारसंहिता लागण्याची शक्यता कमी वाटते आहे. ती लागलीच, तर तिचा खर्च पक्षाच्या खात्यावर जमा होणार आहे.

दुसरीकडे शिवस्वराज्य यात्रा शहरात येणार की नाही,त्याबाबत कळविण्यात आले नसल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी सांगितले. कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागणार असल्याने शहरात ती येण्याची शक्यता धूसर असल्याचे ते म्हणाले.तर, जनआशिर्वाद यात्रेचे नियोजन असले,तरी तारीख नक्की नाही,असे पुणे जिल्हा युवासेना समन्वयक जितेंद्र ननावरे यांनी सांगितले. या यात्रेची सांगता पनवेल येथे होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, एकही यात्रा शहरात येण्याची शक्यता नसल्याने भाजपच नव्हे, तर शिवसेना,राष्ट्रवादीच्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाही हिरमोड होणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख