'ईडी'चं पथक पडळकरवाडीत? 

padalkar_sanjakaka_patil_sangli
padalkar_sanjakaka_patil_sangli

सांगली : सध्या सोशल मीडियावर ईडी आणि भाजप प्रवेश यावर खूप विनोद शेअर केले जात आहेत. एखादे पतीदेव घरी यायला उशीर झाला तरी बायको शंका घेते, शोधा-शोध सुरू होते आणि कोण तरी मग सांगतं भाजपमध्ये गेलं काय बघा... यामुळे आटपाडीतल्या पडळकरवाडीत देखील अशीच चर्चा आहे.

दोन दिवसांपूर्वी "ईडी'ची गाडी आली होती काय याची कानोकानीची चर्चा आहे. कारण पण मोठं आहे. संजयकाकांनी पण इशारा दिला होता की इलेक्‍शन नंतर बघू म्हणून ! पण बिरोबाच्या साक्षीने मी पुन्हा भाजपमध्ये जाणार नाही, अशी शपथ घेणारे आपले गोपीचंद पडळकर पुन्हा भाजपमध्ये परतणार आहेत. काय तरी पडद्यामागची भानगड असणारच !

त्यांनी वंचितला नुकताच घटस्फोट दिला आहे. आपण वंचितला का रामराम केला हे गोपीचंदांनी जे पत्रकारांना सांगितलं ते कोणाला पटेल? पण हे झालं लोकांना सांगण्यासाठी मात्र पडद्यामागचं कारण काय? 

चार महिन्यांपूर्वी हेच गोपीचंद धनगर समाजच्या गळ्यातले ताईद झाले. तरुण कार्यकर्त्यांनी त्यांना डोक्‍यावर घेतले. सभांना गर्दी केली. भाजपवरील टीकेने राष्ट्रवादी व कॉंग्रेसलाही बरे वाटू लागले. पण भाजप नेत्यांच्या तोंडाला फेस आणला होता.

अगदी तासगावात संजयकाकांच्या गावात जाऊन त्यांनी आजपर्यंत आबांनीसुद्धा कधी धुतले नव्हते अशी काकांच्या कारनाम्यांची यादी सांगून महापराक्रम केला होता. त्यांच्यामुळेच वंचितची सांगली जिल्ह्यात हवा झाली. तेच गोपीचंद विधानसभेचे मैदान येताच मैदान सोडून का पळू लागलेत, अशी चर्चा आहे. 

लोकसभेवेळी त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी ऑफर दिली होती. चंद्रकातदादांनी ती खासगीत माध्यमांसमोर उघड केली. ती ऑफर म्हणजेच त्यांना विधान परिषदेची आमदारकी आणि सोबत राज्यमंत्रिपदही. त्यावेळी आयती मिळणारी आमदारकी सोडून लोकसभेला गोपीचंद का बरं लढले ? 

हार खाऊन आता पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा हा गोपीचंदी उद्योग सर्वांना बुचकळ्यात टाकणारा आहे. तरीदेखील लक्ष्मण माने यांना घेऊ नका म्हणत होतेच. अनेकांनी बाळासाहेबांना अर्ध्या चड्डीतले संघ शाखेतील पुरावेही दिले. पण गोपीचंदांनी मात्र बाळसाहेबांवर अशी काही मोहिनी घातली की, त्यांना पक्षातले मोठे पदही त्यांनी देऊन टाकले. 

गोपीचंद पडले, तरी त्यांनी पक्षात सर्वाधिक मते घेतली. एवढे रामायण घडल्यानंतर मग आता गोपीचंदना अशी कोणतीही ऑफर दिली, की त्यासाठी त्यांनी वंचित सोडली. त्यांचंही कुठलं प्रकरण गावलं भाजपवाल्यांना ! पक्षाच्या विचारधारेबाबतसुद्धा त्यांनी केलेले खुलासे तोंडात बोट घालणारे होते. संघ व भाजपचा कावेबाजपणा मला समजला नाही म्हणून त्यांच्यासोबत होतो, आता मला माझ्या समाजाला न्याय देण्यासाठीच मी वंचितमध्ये आलो आहे, असे ते काही तरी म्हणाले होते. 

गोपीचंदना एकच सांगणं आहे. त्यांचं भाषण चांगलं आहे, पण अलीकडं जे बोललं ते सारं रेकॉर्ड होतं... तुम्ही "भाजपमध्ये जायला काय कुत्रे चावलंय काय?' असं जे बोललांत ती टेप लोकच वाजवतील! सोशल मीडियामुळे आता ये पब्लिक है ये सब जानती है... राजकारण म्हणजे चित्रपट नव्हे की, लोकसभेला एक रोल आणि विधानसभेला दुसरा रोल ! पिक्‍चर फ्लॉप झाला की आपटी जोरात होते भाऊ... नाहीतरी तुम्हाला "धुमस'चा अनुभव आहेच की ! 

- चतुर सांगलीकर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com