महिलांना उमेदवारी देण्यात सर्वच राजकीय पक्षांची उदासीनता

महिलांना उमेदवारी देण्यात सर्वच राजकीय पक्षांची उदासीनता

औरंगाबाद : देश आणि राज्य पातळीवर राजकारणात आमदार, खासदार होणाऱ्या महिलांचे प्रमाण अत्यल्प आहे. महिला सक्षमीकरण, स्त्री, पुरूष मतभेद टाळत त्यांना राजकारणात देखील बरोबरीचे स्थान देण्याची आश्‍वासन तर दिली जातात. याची अंमलबजावणी मात्र फारसी केली जात नाही. आगामी विधानसभा निवडणूक आणि ती लढवण्यास इच्छूक असलेल्यांच्या यादीवर नजर टाकली तर त्यात महिलांचे प्रमाण बोटावर मोजण्याइतके आहे. विधानसभा निवडणुकीत महिला उमेदवार देण्यास कुठलाच राजकीय पक्ष फारसा उत्सूक नसल्याचे देखील गेल्या तीस वर्षांच्या निवडणुकांवर नजर टाकली तर स्पष्ट होते. 

आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सध्या सगळ्याच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने इच्छूकांकडून अर्ज देखील भरून घेतले आहेत. तर सत्ताधारी शिवसेना-भाजपकडून थेट उमेदवार जाहीर केले जातील अशी परिस्थिती आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे पाठवण्यात आलेल्या इच्छूकांच्या यादीत महिलांची नावे अभावनेच दिसतात. तर सत्ताधारी पक्षाकडून लढण्यास इच्छूक असलेल्यामध्ये देखील कुठेही महिला पदाधिकाऱ्यांचे नाव समोर येतांना दिसत नाही. 

कुठल्याही राजकीय पक्षाच्या वाटचालीत आणि जडणघडणीत महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भूमिका महत्वाची असते. जिल्ह्यात शिवसेना-भाजप या पक्षांकडे महिलांची ताकद मोठी आहे. तर गेल्या अनेक वर्षापासून राज्यात व केंद्रात सत्ता भोगलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीला देखील महिला पदाधिकाऱ्यांची वानवा कधी भासली नाही. पण लोकसभा, विधानसभा सारख्या मोठ्या निवडणुका आल्या की उमेदवारी देतांना महिलांचा विचारच केला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्याच्या इतिहासात आतापर्यंत महिला खासदार झाल्याची नोंद नाही. तशीच परिस्थिती विधानसभेच्या बाबतीत देखील आहे. 

सिल्लोड, पैठण, कन्नड, वैजापूर, पुर्व, पश्‍चिम या मतदारसंघांमध्ये 1990 ते 2014 या सहा टर्ममध्ये पुर्वमधील शिवसेनेच्या कला ओझा यांचा अपवाद वगळता एकाही महिला पदाधिकाऱ्यास विधानसभेची उमेदवारी देण्यात आलेली नाही. गंगापूरमध्ये तर 1978 पासून आजतागायत कुठल्याच प्रमुख राजकीय पक्षाने महिला उमेदवाराला विधानसभा लढवण्याची संधी दिलेली नाही. 2014 मध्ये फुलंब्री विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. एकंदरित शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांकडे महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी फळी असली तरी त्यांची केवळ संघटनात्मक पदांवरच बोळवण केली जाते. त्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांना अजूनही मुंबई दूरच असल्याचे चित्र आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com