Political leaders meet riot affected Industrialists In Waluj | Sarkarnama

वाळूजमध्ये राजकीय मंडळींच्या भेटींचा शनिवार 

आदित्य वाघमारे 
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

आगामी आठवड्यात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावण्याची घोषणा चंद्रकांत खैरे यांनी केली. ही बैठक शुक्रवारी (ता. 17) होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

औरंगाबाद :  वाळूज औद्योगिक वसाहतीतमधील साठ कंपन्यांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राजकीय मंडळींनी वाळूज औद्योगिक वसाहतीत भेटी दिल्या. खासदार चंद्रकांत खैरे यांनी वाळूजमध्ये तब्ब्ल तीन तास घालवले तर भाजपा आमदार प्रशांत बंब आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सतिष चव्हाण यांनी एकत्रितपणे कंपन्यांच्या नुकसानीची पाहणी केली. 

वाळूजमध्ये गुरुवारी (ता. नऊ) झालेल्या राडा साठ कंपन्यांनासाठी तोटा देणारा ठरला होता. शहरात एका कार्यक्रमासाठी आलेल्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांनी वाळूजच्या घटनांचे गांभिर्य लक्षात घेत दुसऱ्याच दिवशी (शुक्रवारी) पाहणी दौरा केला. या वसाहतीला भेट देणाऱ्या त्या पहिल्या राजकीय व्यक्ती ठरल्या होत्या. 

त्यानंतर लगोलग शनिवारी राज्यकर्त्या भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब आणि विरोधी पक्षाचे आमदार सतिष चव्हाण यांनी एकत्रितपणे कंपन्यांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या दोन आमदारांसह मासिआचे अध्यक्ष किशोर राठी, सुनिक किर्दक, मनिष गुप्ता आदींची उपस्थिती होती.

शनिवारी (ता. 11) सायंकाळी चारला खासदार चंद्रकांत खैरे यांनी वाळूज औद्योगिक संघटनेच्या कार्यालयात बैठक घेत परिस्थिती समजावुन घेत कंपन्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन तास घालवले. त्यांच्यासह डब्ल्युआयएचे अध्यक्ष वसंत वाघमारे, ए. के. सेनगुप्ता, प्रभाकर मते पाटील आदींची उपस्थिती होती. 

औरंगाबादेतील वाळूज औद्योगिक वसाहत ही राज्यातील सर्वात सुदृढ आणि सर्वाधिक कारखाने सुरु असलेली वसाहत आहे. या वसाहतीमध्ये झालेल्या गोंधळावर वाळूज औद्योगिक संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. या दरम्यान झालेल्या चर्चेनंतर आगामी आठवड्यात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावण्याची घोषणा चंद्रकांत खैरे यांनी केली. ही बैठक शुक्रवारी (ता. 17) होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख