सह्याद्री कारखान्याचे संचालक ते साताऱ्याचे पालकमंत्री : बाळासाहेब पाटील यांचा राजकीय प्रवास - Political Journey of Minister Balasaheb Patil | Politics Marathi News - Sarkarnama

सह्याद्री कारखान्याचे संचालक ते साताऱ्याचे पालकमंत्री : बाळासाहेब पाटील यांचा राजकीय प्रवास

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

1992 मध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक पदापासून बाळासाहेब पाटील सहकाराच्या समाजकारण व राजकारणास सुरवात केली. 1996 ला ते सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष झाले. पक्षनिष्ठा आणि सहकार आणि राजकारणातील कामाची दखल घेऊन शरद. पवार यांनी त्यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री व आता साताऱ्याचे पालकमंत्री पद दिले

सातारा : 1992 मध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक पदापासून बाळासाहेब पाटील सहकाराच्या समाजकारण व राजकारणास सुरवात केली. 1996 ला ते सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष झाले. त्यानंतर तब्बल 24 वर्षे या पदावर कार्यरत आहेत. 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांनी शरद पवारांसोबत जात तब्बल पाच पंचवार्षिक ते कऱ्हाड उत्तर मतदारसंघातून आमदार झाले. पक्षनिष्ठा आणि सहकार आणि राजकारणातील कामाची दखल घेऊन श्री. पवार यांनी त्यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री व आता साताऱ्याचे पालकमंत्री पद दिले.

ज्येष्ठ नेते (कै) यशवंतराव चव्हाण यांचे विश्‍वासू सहकारी व कऱ्हाड नगरपालिकेचे 42 वर्षाहून अधिक काळ नगराध्यक्षपद भूषवलेल्या (कै) पी. डी. पाटील यांचे बाळासाहेब पाटील हे सुपुत्र आहेत. (कै.) पी. डी. पाटील यांनी 1980 व 1995 असे दोन पंचवार्षिक कऱ्हाड उत्तरचे प्रतिनिधीत्व केले. तसेच कऱ्हाड उत्तरचे भाग्यविधाते म्हणून (कै.) पी. डी.पाटील यांची ओळख आहे. नागरी विकास, सहकार या क्षेत्रात पी. डी. पाटील यांचे मोठे योगदान दिले. त्यांचाच वारसा त्यांचे सुपूत्र पालकमंत्री व राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे चालवत आहेत.

बाळासाहेब उर्फ शामराव पांडुरंग पाटील कला शाखेतील पदवीधर आहेत. 1992 पासून सहकाराच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात सक्रीय झाले. 1992 ला कऱ्हाडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक झाले. त्यानंतर 1996 ला सह्याद्री कारखान्याची अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे सोपविण्यात आली. तेव्हापासून ते आजतागायत ते कारखान्याचे अध्यक्ष आहेत. 1999 ला राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तसेच कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणुक लढविली. ते पहिल्यांदा आमदार झाले. 

त्यानंतर 2004, 2009, 2014 तसेच नुकत्याच झालेल्या 2019 च्या विधानसभा निवडणूकीत निवडून येत सलग पाचवेळा ते आमदार झाले. 2012 ते 2014 या कालावधीत विधानसभा अंदाज समिती प्रमुख म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. 1994 पासून कऱ्हाड शिक्षण मंडळाचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य तसेच यशवंतनगर येथील सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, कऱ्हाड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. जानेवारी 2016 ला सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या स्विकृत संचालकपदी त्यांची निवड झाली. 2002-03 सालासाठी महाराष्ट्र विधानमंडळातील नगरविकास विभाग व गृहनिर्माण विभागाशी संलग्न स्थायी समितीचे सदस्य झाले. ऑगस्ट 2002, जानेवारी 2007 मध्ये मांजरी बुद्रुक पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे गव्हनिंग कौन्सिल सदस्य म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली.

डिसेंबर 2003 ला महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर 2006 मध्येही राज्य साखर संघच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 2007 मध्ये सलग दुसऱ्यांदा राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली. त्यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखाना आदर्शपणे चालवून गाळप आणि ऊसदराचा वेगळा पायंडा पाडला आहे. जानेवारी 2005 पासून कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीवर ते विश्वस्त-खजिनदार म्हणून नियुक्त आहेत. जून 2005 पासून कऱ्हाड येथील सौ. वेणुताई चव्हाण चॅरिटेबल पब्लिक ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त म्हणून त्यांची निवड झाली. नोंव्हेंबर 2006 ते आक्‍टोबर 2009 या कालावधीत महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर त्यांची नियुक्ती झाली.

मुंबई येथील (कै) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे पदसिद्ध कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. नोव्हेंबर 2008 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कऱ्हाड येथील विभागीय केंद्राचे उपाध्यक्ष पदावर त्यांची निवड झाली. जुलै 2014 ला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कऱ्हाड विभागीय केंद्राच्या अध्यक्षपदावर त्यांची निवड झाली. मार्च 2009 ला पुणे येथील नॅशनल हेवी इंजिनिअरींग को-ऑप. संस्थेचे संचालक म्हणून निवड झाली. सप्टेंबर 2010 ला नवी दिल्ली राष्ट्रीय सहकारी साखर संघ संस्थेवर दक्षिण मध्य महाराष्ट्रातून संचालक पदावर बिनविरोध निवड झाली. डीसेंबर 2012 ला नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या संचालक पदी त्यांची दुसऱ्यांदा निवड झाली. 

1994 ते 96 या कालावधीत सह्याद्रि ऊस उत्पादक व तोडणी वाहतूक सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. त्याशिवाय सह्याद्रि सहकारी साखर कारखाना पुरस्कृत उपसा जलसिंचन योजनांचे अध्यक्ष, कऱ्हाड येथील सह्याद्रि सहकारी बॅंक, संजीवनी नागरी सहकारी पतसंस्थेवरही त्यांची बिनविरोध निवड झाली. कऱ्हाड येथील कृष्णाई सहकारी दुध व्यावसायिक संस्थेसह अन्य सहकारी संस्थांच्या उभारणीत त्याचे मोलाचे सहकार्य केले. 

प्रभावी संघटन कौशल्य व सर्वसामान्यांच्या प्रश्नासंबंधी तळमळ असल्याने त्यांचनी विधानसभेच्या माध्यमातून अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहे. 2009 मध्ये अपक्ष निवडणूक लढवून प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे अतुल भोसले यांच्यावर सुमारे 42 हजारहून अधिक मताधिक्‍य घेत विजयी झाले होते. सध्या नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये 30 डिसेंबर 2019 ला त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्याकडे सहकार व पणन मंत्री पदाची तसेच साताऱ्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी आली आहे.

हे देखिल वाचा - निफाड कारखाना सुरु करण्यासाठी अजित पवारांना साकडे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख