पहिलं पाऊल - गिरणी कामगाराचा मुलगा ते राज्याचा महसूलमंत्री

घरात अठराविश्‍व दारिद्रय असतानाही चंद्रकांत पाटील यांनी आपल्या आयुष्यात गरूडझेप घेतली. साधा गिरणी कामगाराचा मुलगा राज्याचा महसूलमंत्री झाला. अर्थात हा प्रवास सहज नव्हता. अभाविपपासून सुरू झालेली राजकीय कारकिर्द दादांनी आपल्या स्वकर्तृत्वाने घडवली. विचारांचं सोनं केलं. निष्ठेने काम करत राहिले. फळाचा विचार केला नाही. फळ मिळालं तरी त्याचा टेंभा कधी मिरवला नाही. या राजकीय यशाचा प्रवास खुद्द दादांच्याच शब्दांत
पहिलं पाऊल - गिरणी कामगाराचा मुलगा ते राज्याचा महसूलमंत्री

मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपात अनेक कुटुंबांची वाताहत झाली होती. त्यापैकीच आमचं एक कुटुंब. घरात अठराविश्‍व दारिद्रय होते. पाच बहिणी, मी व आई-वडील असे आमचे मोठे कुटुंब. वडील मिलच्या कॅंटिनमध्ये कामगारांना चहा देण्याचे काम करायचे. आईही त्याच मिलमध्ये कपड्याच्या कचऱ्यांमधील उरलेला चांगला कपडा शोधून काढण्यासाठी कचऱ्यात बसून काम करत असायची.

ऐका चंद्रकांतदादांचा राजकीय प्रवास खालील व्हिडिओमध्ये

आई-वडील दोघेही निरक्षर. वडिलांना फक्त बच्चू पाटील ही स्वतःच्या नावाची सही करायला यायची एवढेच. गिरणी कामगारांपेक्षाही खालच्या स्तरावरील काम दोघेही करत होते. आम्ही मुंबईतील रे रोड रेल्वे स्टेशनच्या जवळील नारळवाडीत राहायचो. मुंबईत चाळीत दोन खोल्या होत्या. सिद्धार्थ महाविद्यालयातून बी. कॉमची परीक्षा पास झालो; पण गिरणी कामगारांच्या संपामुळे लगेच नोकरी करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा , असा घरच्यांचा आग्रह होता.

महाविद्यालयात असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो होतो. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने सुरवातीला मी परिषदेचे दोन वर्षेच काम करण्याचा निर्णय घेतला होता. पुढे तेरा वर्षे या संघटनेच्या कामात पूर्णपणे कसा गढून गेलो, हे समजलेच नाही. आमचे कुटुंबीय मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटीचे (खानापूर). परंतु आई-वडील दोघेही मफतलाल दोनमध्ये गिरणीत नोकरीला असल्याने मी तसा मुंबईकरच. घरापासून लांब राहून परिषदेचे काम करताना 1980 ते 1993 या काळात तीन राज्यांची जबाबदारी पार पाडली. संघटनेच्या निमित्ताने काश्‍मीर ते कन्याकुमारी व गुजरात ते आसाम असे भारतभ्रमण झाले. त्यामुळे खऱ्या अर्थाने देश उमगला. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय झालो.

दुसरीकडे दोन वर्षे गिरणी संपाची झळ सोसल्यानंतर आई वडिलांपुढे घर कसे चालवायचे असा प्रश्न पडला होता. मुंबईतील एक घर विकून आई-वडील कुटुंबासह गावी गेले. संघटनेने दिलेली जबाबदारी पार पाडून वयाच्या 33 व्या वर्षी मी पुन्हा मुंबईत परतलो; बीकॉम ची पदवी हाती होती. पण पहिला रुपया मुंबईत मिळणार नाही, असे वाटल्याने मीही गावी गेलो. शेती आणि काजूचा कारखाना काढून स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे तीन जिल्ह्यांचे काम सलग दोन वर्षे मी केले होते. 15 वर्षे काम केल्यानंतरही राजकारणात सक्रिय होण्याबाबत कोणताही विचार मनात शिवलेला नव्हता.

राजकारणात अखेर प्रवेश
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोद महाजन, विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सततच्या आग्रहामुळे मी राजकारणात येण्याचा विचार केला. निवडणुका लढणे, पाडापाडीचे राजकारण हा माझा स्वभाव नसल्यामुळे मी भाजपचे काम सुरू करताना राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी घडविणाऱ्या भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कामामध्ये पूर्ण वेळ सहभागी झालो. पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघात प्रकाश जावडेकर यांचा पराभव झाला होता. नारायण वैद्य यांच्यापासून विजयाची परपंरा असलेल्या या मतदारसंघातील जावडेकर यांचा पराभव भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांना जिव्हारी लागला होता.

कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे या भागातील विद्यार्थी चळवळीतील पदाधिकाऱ्यांशी चांगले नेटवर्क असल्याने या मतदारसंघांतील 2008 ची विधान परिषदेची निवडणूक मी लढवावी, असा आग्रह भाजपमधील नेतेमंडळींनी धरला. जनता दलाचे तत्कालीन आमदार शरद पाटील यांचा नऊ हजार मतांनी पराभव करून पहिल्यांदा मी आमदार झालो. तेथून दुसऱ्यांदा आमदार झालो. पक्षाच्या कामात झोकून दिले.

अमित शाह यांच्याशी मैत्रीचा धागा
राज्यात 2014 मध्ये सत्तांतर झाल्यावर राष्ट्रीय पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी माझ्यापुढे प्रदेशाध्यक्षपद आणि मंत्रिपद असे दोन पर्याय ठेवले होते. माझे पाकीट कोरे आहे, तुम्ही जो निर्णय घ्याल, तो मान्य असेल असे मी त्यांना सांगितले. मला मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यातही महत्त्वाची तीन मोठी खाती देऊन विश्‍वास दाखवण्यात आला. मंत्रिमंडळात थोडे बदल झाले. त्यात माझ्यावर महसूल खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली. जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेण्याची संधी मिळाली. राजकारणात जाऊन कधी नगरसेवक व्हावे, असा विचार मनात आला नव्हता. मात्र पक्षाने, नेत्यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला. त्या विश्‍वासास पात्र होण्यासाठी माझी नेहमी धडपड असते. माझ्याप्रमाणे अनेक संघ कार्यकर्त्यांनी असे झोकून देऊन काम केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत असताना विद्यमान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याशी यापूर्वी गुजरातमध्ये परिषदेच्या माध्यमातून काम करताना ओळख झाली होती. विचार आणि काम करण्यासाठी एकच व्यासपीठ असल्याने पुढे आमची मैत्री झाली. अनेक ठिकाणी आम्ही एकत्र फिरुन अभाविपसोबतच संघाचे काम केले. त्यातही मी महाराष्ट्रावर जास्त फोकस केल्याने मधल्या काळात राजकीय संपर्क कमी झाला होता. अमितभाईंचे महाराष्ट्रात तसेच कोल्हापूर येथे त्यांचे येणे होत होते त्यावेळी त्यांची भेट झाली होती.

महाराष्ट्रातील2014 च्या सत्तापरिवर्तनानंतर अमितजीनी माझ्यावर विश्वास टाकला. महाराष्ट्रातील भाजप सरकार मजबूत व्हावे यासाठी, त्यांनीच माझ्यावर मित्रपक्षांना एकत्र ठेवण्याची आणि त्यांच्यातील सुसंवाद घडवून आणण्याची जबाबदारी सोपविली होती. ती मी नीट पार पाडली. राज्यात 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना व भाजप स्वतंत्र निवडणूक लढले त्यांना सत्तास्थापनेसाठी एकत्र आणण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली होती. शिवसेना नेतृत्वाबरोबर चर्चा करण्याचे काम जिकरीचे होते. निवडणूक प्रचारा दरम्यान झालेल्या आरोप प्रत्यारोपातून पुन्हा दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, असे भाजप नेतृत्वाला वाटत होते. पुढे तसे घडले आणि सेना सत्तेत सहभागी झाली. हा सुवर्णमध्य साधताना अभाविप आणि संघाच्या कामाचा अनुभव कामी आला.

जुन्या अनुभवांची शिकवण
माझ्या या साऱ्या प्रवासात राज्यातच नव्हे तर देशभरात खूप सहकारी मित्र लाभले. संघामध्ये संन्यस्त वृत्तीने जीवन जगून काम अनेक जण करत असतात. हे व्रत्त तेव्हापासून मी अंगी बाळगले. संघटन कौशल्य त्यामुळेच आजही मी लोकसेवा आणि संघ विचारासाठी बांधील आहे. या प्रवासात राज्यभरात असंख्य कार्यकर्त्यांच्या घरी मी राहिलो. सुमारे 10 हजारांच्या घरात ही संख्या असेल. ज्यांच्याकडे अनेकदा गेलो. राहिलो त्यांची संख्या किमान पाच हजार आहे. ज्यांची मी नावे घेउ शकतो अशांची संख्या मोठी आहे. मंत्रिमंडळातील सहकारी विनोद तावडे यांच्या घरी मी राहिलो आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे कॉलेजमध्ये जीएस असताना पासूनची ओळख आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरपंत हे संघ किंवा अभाविपचे कार्यकर्ते घरी आले की त्यांना जेवल्याशिवाय पाठवत नव्हते. पूर्णवेळ संघसेवेत असल्याने नोकरी करता येत नव्हती. त्यामुळे हॉटेलचे जेवण परवडत नव्हते. कार्यकर्त्यांच्या घरी वार लावून दिवस काढले आहेत. आज मंत्री पदावर काम करताना मागे वळून पाहतो त्यावेळचे अनुभव आजचे काम करताना फायदेशीर ठरताना दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com