पस्तीस वर्षांच्या संघर्षानंतर मिळाली आमदारकीची संधी : आमदार संजय गायकवाड बुलडाणा विधानसभा मतदारसंघ

नगर पालिकेपासून राजकीय कारकिर्दीला सुरवात करून न थांबता, न थकता, पराभवाने खचून न जाता सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करीत राहिल्यानेच जनतेने आपल्याला मतांचा भरघोस आशीर्वाद दिला. त्यामुळे पस्तीस वर्षाचा संघर्ष कामी आला तो आता आमदार झाल्यामुळे. आगामी पाच वर्षात मतदारसंघातील जनतेचे हे ॠण लोकोपयोगी कामे करून फेडण्याचा आपण संकल्प केला आहे असे सांगत आमदार संजय गायकवाड यांनी आपली राजकीय वाटचाल 'सरकारनामा'शी बोलताना मांंडली
Buldana Shivsena Mla Sanjay Gaikwad Political Journey
Buldana Shivsena Mla Sanjay Gaikwad Political Journey

बुलडाणा : नगर पालिकेपासून राजकीय कारकिर्दीला सुरवात करून न थांबता, न थकता, पराभवाने खचून न जाता सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करीत राहिल्यानेच जनतेने आपल्याला मतांचा भरघोस आशीर्वाद दिला. त्यामुळे पस्तीस वर्षाचा संघर्ष कामी आला तो आता आमदार झाल्यामुळे. आगामी पाच वर्षात मतदारसंघातील जनतेचे हे ॠण लोकोपयोगी कामे करून फेडण्याचा आपण संकल्प केला असल्याचे मत नवनिर्वाचीत आमदार संजय गायकवाड यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केले.

आपले राजकीय कारकिर्दीचा आलेखच त्यांनी आपल्या मुलाखतीत मांडला. ''बुलडाणा नगर पालिकेपासून आपण आपली राजकीय कारकिर्द सुरू केली. लोकांची छोटी मोठी कामे करण्याची पुर्वीपासूनच आवड होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी पेटून उठून अन्यायाचा प्रतिकार करणे आणि अडले नडल्यांची कामे करणे आपल्या रक्तातच होते. त्यामुळे बुलडाणा नगर पालिकेमध्ये सातत्याने अठ्ठावीस वर्षे नगर सेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. दरम्यानच्या काळात सभापती व स्विकृत सदस्य म्हणूनही काम करता आले,'' असे त्यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले, "नगर पालिकेचे राजकारण सांभाळता सांभाळता आपण विधानसभेची तयारी सुरू केली. 1999 मध्ये सर्वप्रथम विधानसभेची निवडणूक लढविली ती अपक्ष म्हणूनच. त्यावेळी मात्र मतदारांनी आपल्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. पाच हजार तीनशे साठ मते मिळाली. पराभव झाला. परंतू, पराभवाने खचलो नाही. जनतेची कामे करीत राहिलो. 2004 च्या निवडणूकीत पुन्हा एकदा तरूणाईच्या बळावर हिम्मत बांधली आणि उभा राहिलो. यावेळी मतदारांनी सन्मानजनक 32 हजार 351 मते दिली. मात्र, पराभवाने पाठ सोडली नाही. 2009 मध्ये निवडणूकीच्या रिंगणात नव्हतो. परंतु, नंतरच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धुरा सांभाळली. रस्त्यावर उतरून आंदोलने केली. अनेक धर्मांतराचे प्रयत्न हाणून पाडले. मुलींची सुटका केली, व संघर्ष सुरु ठेवला.''

''2014 च्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारीवर उभा राहिलो. तरूणांची प्रचंड शक्ती पाठीशी होती. त्याहीवेळी मतदारांनी 35 हजार 324 एवढी मते देवून दुसर्‍या क्रमांकावर आणून ठेवले. मात्र, विजयाचा पिच्छा सोडायचाच नाही हा चंग मनाशी बांधला होता. दरम्यान शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पदावर काम करण्याची संधी मिळाली. खासदार प्रतापराव जाधवांची समर्थ साथ आणि कार्यकर्त्यांचे पाठबळ या जोरावर संपूर्ण मतदारसंघात भगवा झंझावात निर्माण केला. ताकदीने पाच वर्षे काम करून अधिकाराने उमेदवारी मागीतली. पक्षानेही आपली जिद्द, धडपड आणि काम करण्याची तळमळ पाहून संधी दिली. मतदारांच्या आशिर्वादाने या संधीचे सोने करता आले. बुलडाणेकर जनतेने कधी नव्हे एवढ्या 67 हजार 785 मतधिक्याने आपल्या गळ्यात विजयाची माळ घातली. त्यामुळे विधानसभेची पायरी चढता आली.'' असे ते म्हणाले.

आता आगामी पाच वर्षात जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरून मतदार संघाच्या विकासाच्या अपेक्षांचे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान समोर आहे. ते आपण यशस्वीपणे पुर्ण करू असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com