घरकुल निकालाने जळगावच्या राजकीय 'दादा'गिरीचा अस्त

जळगाव पालिकेच्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन,आमदार चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक विद्यमान नगरसेवकांना शिक्षा झाली आहे. यातील काही जण विधानसभेसाठीही इच्छुक होते. त्यामुळे हे पक्ष हे शिक्षा झालेले नेते आणि नगरसेवकांबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष असून आता विधानसभेच्या निवडणुकीच्या राजकारणाची गणितेही आता बदलणार आहेत.
घरकुल निकालाने जळगावच्या राजकीय 'दादा'गिरीचा अस्त

जळगाव : जळगाव पालिकेच्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन,आमदार चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक विद्यमान नगरसेवक यांना शिक्षा झाली आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेस वगळता भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे आजी माजी नगरसेवक यात आहेत.

यातील काही जण विधानसभेसाठीही इच्छुक होते. त्यामुळे हे पक्ष हे शिक्षा झालेले नेते आणि नगरसेवकांबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष असून आता विधानसभेच्या निवडणुकीच्या राजकारणाची गणितेही आता बदलणार आहेत. राजकारणात सुरेशदादा जैन यांनी आपले वेगळे वर्चस्व निर्माण केले होते. त्या निकालामुळे त्या वर्चस्वाचाही अस्त झाला आहे. 

जळगाव विधानसभा मतदार संघातून शिवसेनेतर्फे सुरेशदादा जैन व जळगाव ग्रामीण मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे गुलाबराव देवकर यांचा उमेदवारीचा दावा होता. मात्र त्यांना शिक्षा झाल्यामुळे ते उमेदवार असण्याची शक्‍यता आता कमीच आहे.सुरेशदादा जैन यांच्याबाबतीत विचार करावयाचा झाल्यास न्यायालयाने त्यांना सुनावलेल्या शिक्षेमुळे त्याची गेल्या 35 वर्षापासूनची राजकीय कारकिर्द संपुष्टात आली आहे. जळगाव पालिकेवर सत्तेसह त्यांनी तब्बल आठ टर्म आमदार म्हणून ते राहिले आहेत. याच माध्यमातून राज्यातील मंत्रीपदावरही काही काळ ते राहिले आहेत. 

मात्र, घरकुल गैरव्यवहारप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. तब्बल चार वर्षे त्यांना जामीन न मिळाल्याने तुरूगांत रहावे लागले होते. याच दरम्यान सन 2014मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यांचा पराभव झाला. आमदारकीचा हा त्यांचा पहिला पराभव होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतही त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पराभव पत्करावा लागला. अन गेल्या पस्तीस वर्षाची पालिकेवरील त्यांची बहुमताची सत्ताही संपुष्टात आली. मात्र त्यांची विधानसभेला निवडणूक लढण्याची तयारी कायम होती. परंतु घरकुल प्रकरणाच्या निकालावर सर्व अवलंबून होते. आज न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावल्याने त्यांची राजकीय आव्हानही संपल्याचे दिसत आहे. 

या शिवाय शिवसेनेचे चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनाही या प्रकरणात शिक्षा झालेली असल्याने त्यांच्या उमेदवारीवरही शिवसेना काय भूमिका घेणार याकडेच लक्ष असणार आहे. मात्र या निकालामुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेची ताकदीही कमजोर होईल हे निश्‍चित आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेमुळे जळगाव ग्रामीणमधील त्याचे उमेदवारीचे आव्हानही संपुष्टात आले आहे. राज्याचे सहकारराज्यंमत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात सन 2008 मध्ये निवडणूक लढवून देवकर विजयी झाले होते. त्यावेळी राज्याच्या मंत्रीमंडळात त्यांना राज्यमंत्रीपदही मिळाले होते. मात्र घरकुल प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांना अटक झाल्याने त्यांचे मंत्रीपदही गेले होते. लोकसभा निवडणूकीत देवकर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार होते. मात्र, भाजपचे उन्मेश पाटील यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. ते आता पुन्हा जळगाव ग्रामीणमधून राष्ट्रवादीतर्फे उमेदवारीची तयारी करीत आहेत. 

मात्र खटल्यातील शिक्षेमुळे त्यांच्या उमेदवाराचे आव्हानही संपुष्टात आले आहे. त्या शिवाय राष्ट्रवादीची ताकदही क्षीण होणार आहे. त्यामुळे आता या मतदार संघातून शिवसेनेचे ताकदवार उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या विरोधात कोण उमेदवार याकडेच लक्ष आहे. सुरेशदादा जैन यांच्या राजकीय कारकिर्दीतील वारसदारावर नेहमीच चर्चा होत आलेली आहे. मात्र, या निकालामुळे त्यांचा वारसदार म्हणून पुढे कोणाचे नाव येणार, याकडेच लक्ष असणार आहे. 

याच प्रकरणात शिक्षा झालेले नगरसेवक पूर्वी जैन यांच्या गटात होते. मात्र, त्यातील काही जण आज भारतीय जनता पक्षात आहेत.पारदर्शी भूमिका असणारे भारतीय जनता पक्ष आता शिक्षा झालेल्या नगरसेवकांच्या बाबतीत काय भूमिका घेणार आहे? हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. कारण विधानसभा निवडणूकीत या निकालाचे पडसाद निश्‍चित उमटणार आहेत. सत्ताधारी शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांना शिक्षा झालेली आहे, तर 'भाजप'चे विद्यमान नगरसेवकांनाही शिक्षा झालेली आहे.

राष्ट्रवादी नेते देवकरांनाही शिक्षा झाली आहे. त्यामुळे केवळ कॉंग्रेस पक्षाचेच कोणीही यात नाहीत. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष विधानसभा निवडणूकीत जनतेसमोर हे घेवून जाणार हे निश्‍चित आहे. सत्ताधारी "भाजप' व "शिवसेना' याला काय उत्तर देणार हे पाहण्यासारखे आहे. पण सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या पक्षांची कोंडी झालेली आहे. जिल्ह्यातील विधानसभा निवडणूका या मुद्यावर गाजणार हे मात्र नक्की आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com