political battle at vidharbha's shivaji shikshan sanstha | Sarkarnama

विदर्भातील शिवाजी शिक्षण संस्थेत रणधुमाळी सुरू 

श्रीकांत पाचकवडे : सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 10 एप्रिल 2017

विदर्भातील सर्वांत मोठ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डॉ.अरुण शेळके यांना टक्कर देण्यासाठी सहकार नेते माजी मंत्री वसंतराव धोत्रे यांनी परिवर्तन पॅनेल स्थापन करून कंबर कसली आहे.

अकोला : विदर्भातील सर्वांत मोठ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डॉ.अरुण शेळके यांना टक्कर देण्यासाठी सहकार नेते माजी मंत्री वसंतराव धोत्रे यांनी परिवर्तन पॅनेल स्थापन करून कंबर कसली आहे. परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून अध्यक्षपदासाठी माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत डॉ. शेळके गटाविरुद्ध धोत्रे गटाचा सामना रंगणार आहे. 

बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्‍य प्रत्यक्षात उतरवीत ग्रामीण भागातील बहुजन, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दारे उघडी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांनी डिसेंबर 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. एका प्राथमिक शाळेपासून लावलेल्या या इवल्याशा रोपट्याचे आज संपूर्ण विदर्भात 278 शाळा, महाविद्यालय आणि वसतिगृह रूपाने विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. 

विदर्भात सर्वांत मोठी शिक्षण संस्था म्हणून नावारूपास आलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेत संध्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गत दोन टर्मपासून या संस्थेच्या अध्यक्षपदावर डॉ. अरुण शेळके कार्यरत आहेत. गत निवडणुकीत डॉ. शेळके, हर्षवर्धन देशमुख व दिलीपबाबू इंगोले यांच्यात तिरंगी लढतीचा सामना रंगला होता. तेव्हा गटा-तटाच्या राजकारणाचा फायदा डॉ. शेळकेंना मिळाला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत संस्थेत भीष्माचार्य म्हणून ओळख असलेले व शिवपरिवारात आपल्या शिस्तप्रिय कार्यप्रणालीमुळे वेगळी छाप पाडणारे माजी मंत्री वसंतराव धोत्रे यांनी निवडणुकीची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. 

गतवेळेस झालेल्या चुका टाळून शेळके यांच्याविरोधातील सर्व गट-तटांना एकत्रित आणण्यात वसंतराव धोत्रे यांना यश आले आहे. परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून शेळके यांना थेट लढत देण्याकरिता संस्थेचेच माजी पदाधिकारी तथा माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या नावावर सर्वांचे एकमत झाले आहे. 

परिवर्तन पॅनेलकडून देशमुख यांना निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याने या निवडणुकीची रंगत वाढणार आहे. यासोबतच परिवर्तन पॅनेलकडून दोन उपाध्यक्ष पदाकरिता आबासाहेब बुरघाटे, नरेशचंद्र ठाकरे तर कोषाध्यक्ष पदाकरिता दिलीपबाबू इंगोले यांच्या नावावरही एकमत झाल्याची चर्चा आहे. उर्वरित संचालकांकरिता उमेदवारांची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. 

31 मे रोजी होत असलेल्या या निवडणुकीसाठी परिवर्तन पॅनेलने उमेदवारांच्या नावांची घोषणा करून प्रत्यक्ष मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. शेळके गटाकडून यावेळी कोणते उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरविल्या जातात, हे निश्‍चित झाल्यानंतरच निवडणुकीचा खरा सामना रंगणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख