बदल्यांच्या गॅझेटमध्ये ‘एलसीबी’त खांदेपालट - Police Tranfers | Politics Marathi News - Sarkarnama

बदल्यांच्या गॅझेटमध्ये ‘एलसीबी’त खांदेपालट

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मे 2017

लाचखोरीच्या दोन घटना आणि तपासाच्या नावाखाली पोलिसांनी कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारल्याच्या प्रकरणामुळे एलसीबीला पर्यायाने पोलिस दलालाच  कलंक लागला गेला. चोरीचा गुन्हा दाखल झालेले सातजण निलंबित झाले. तर यानिमित्ताने एलसीबी मध्ये तळ ठोकून असलेले चेहरेही समोर आले. पंधरा-पंधरा वर्षांपासून काहीजण कार्यरत आहे. ‘एलसीबी’त काम करण्यासाठीच संबंधित पोलिस भरती झाले की काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सांगली - वारणानगर येथे चोरीचा तपास करताना ‘एलसीबी’च्या दोन अधिकाऱ्यांसह सातजणांनी नऊ कोटी १८ लाखांचा ‘डल्ला’ मारल्याबद्दल गुन्हा दाखल झाला. त्यामुळे संपूर्ण राज्यभर सांगली पोलिसांची प्रतिमा काळवंडली गेली. ‘एलसीबी’चा झाकलेला मुखवटा समाजासमोर आला. त्याचबरोबर अनेक वर्षांपासून ‘एलसीबी’त तळ ठोकून असलेले चेहरेही समोर आले. यंदाच्या बदल्यांच्या ‘गॅझेट’मध्ये ‘एलसीबी’मध्ये बदल होणार हे निश्‍चित समजले जाते. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील  यांनीही घटनेनंतर त्याला दुजोरा दिला होता.

गुन्हेगारांना शोधणे आणि प्रलंबित गुन्ह्याचा छडा लावणे हे ‘एलसीबी’ चे खरे काम आहे. तंत्रज्ञानाची मोठी मदत आणि खबऱ्यांचे नेटवर्क यामुळे एलसीबी ची नेहमी तपासात आघाडी असते. जिल्हा कार्यक्षेत्र असल्यामुळे कोठेही जाऊन स्थानिक पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा पर्दाफाशही केला जातो. त्यामुळे एलसीबी ला पोलिस दलात मानाचे स्थान असते. तेथे नियुक्ती होण्यासाठी प्रतिवर्षी अनेकांचे विनंती अर्ज येतात; तर एलसीबी तून बदली होऊ नये म्हणून कार्यरत असलेले अनेकजण प्रयत्नशील असतात. सांगली एलसीबी ने गेल्या दहा-पंधरा वर्षांत अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावला. नावलौकिक मिळवला. मात्र लाचखोरीच्या दोन घटना आणि तपासाच्या नावाखाली पोलिसांनी कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारल्याच्या प्रकरणामुळे एलसीबीला पर्यायाने पोलिस दलालाच  कलंक लागला गेला. चोरीचा गुन्हा दाखल झालेले सातजण निलंबित झाले. तर यानिमित्ताने एलसीबी मध्ये तळ ठोकून असलेले चेहरेही समोर आले. पंधरा-पंधरा वर्षांपासून काहीजण कार्यरत आहे. ‘एलसीबी’त काम करण्यासाठीच संबंधित पोलिस भरती झाले की काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कोणीही ‘एसपी’ आणि कोणीही निरीक्षक येऊ दे, काहीच फरक पडत नाही, अशा आविर्भावात येथे काहीजण काम करतात.

‘डिटेक्‍शन’ आणि ‘कलेक्‍शन’ असे दोन प्रकारचे कर्मचारी येथे कार्यरत आहेत. नव्या दमाच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी खऱ्या अर्थाने डिटेक्‍शन करून एलसीबीची खरी व्याख्या सार्थ ठरवली. तर कलेक्‍शन करणारे व्याख्याच बदलून टाकली आहे. वारणानगर चोरीचा तपास करताना ‘डल्ला’ मारल्याची चर्चा एलसीबीमध्ये रंगली होती. त्यामुळे सातजणांनी काहीजणांना ‘पोटलाभार्थी’ बनवले असल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

एलसीबीचे शुद्धीकरण..
बऱ्याच वर्षांनंतर एलसीबीच्या कारभाराची लक्तरे या प्रकरणानंतर वेशीवर टांगली गेली. त्यामुळे हा विभाग शुद्धीकरण करण्याची आवश्‍यकता भासू लागली आहे. तळ ठोकून असलेल्या कर्मचाऱ्यांबाबत विचारणा केल्यानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी खांदेपालट करण्याचे संकेत दिले होते. आता ‘गॅझेट’ची वेळ आल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात खांदेपालट होण्याची शक्‍यता आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख