SP पाटीलच्या  अटकेसाठी पुणे-कोल्हापूरला पथक रवाना : महिला काॅन्स्टेबलचा विनयभंग

SP पाटीलच्या  अटकेसाठी पुणे-कोल्हापूरला पथक रवाना : महिला काॅन्स्टेबलचा विनयभंग

नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातील सहकारी महिला शिपायाला एक कोटी रूपये आणि फ्लॅटचे आमिष दाखवून शारीरिक संबंधाची मागणी करणाऱ्या एसीबीचे अधीक्षक प्रद्‌युम्न पाटील (पी. आर. पाटील) यांच्या शोधासाठी सदर पोलिसांचे पथक पुणे आणि कोल्हापूरला रवाना करण्यात आले. पाटील यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागल्याने सुटीचा अर्ज टाकून ते रजेवर निघून गेले होते. दरम्यान, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे एसीबीच्या पोलिस महासंचालक कार्यालयाने त्यांची चौकशी सुरू केल्याची विश्वसनीय माहिती आहे.

पोलिस अधीक्षक पाटील यांनी आपल्याच कार्यालयात कार्यरत असलेल्या 29 वर्षीय महिला पोलिस शिपायास एक कोटी रूपये, पुण्यात फ्लॅट, कार आणि दैनंदिन खर्चपाण्याला 20 लाख रूपये देण्याचे आमिष दाखवले होते. त्या बदल्यात पाटील यांनी तिला शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, महिला कर्मचाऱ्याने ही ऑफर धुडकावून लावत पोलिस महासंचलक (एसीबी) संजय बर्वे यांच्याकडे पोलिस अधीक्षक पाटील यांची तक्रार केली होती.

प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात येताच बर्वे एक चौकशी समिती गठित केली. त्यानंतर महिला शिपायाला मुंबईला बोलविण्यात आले. तिची तेथे सखोल चौकशी करण्यात आली. महिला शिपायाच्या मोबाईलवर पाटील यांनी पाठविलेले मेसेज, अश्‍लिल छायाचित्रे, व्हिडियो कॉलिंग, व्हॉईस कॉलिंग चौकशी पथकाला दाखविले. तब्बल आठ दिवस चौकशी झाल्यानंतर चौकशी समितीने आपला अहवाल डीजी बर्वे यांना सादर केला. त्यानंतर बर्वे यांनी समितीतील एका सदस्याला नागपूरला पाठवून पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगितले. आपल्यावर गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण पाटील यांना लागली होती. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पाटील यांनी किरकोळ रजेचा अर्ज टाकून कार्यालयातून निघून गेले. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ते सध्या पसार झाले आहेत. 

मोबाईल स्वीच ऑफ 

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नागपुरातील एका वकिलाशी त्यांनी संपर्क केल्याची माहिती आहे. मात्र, पाटील यांनी स्वतःचा फोन स्विच ऑफ करून ठेवला आहे. दोन-चार दिवसात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात कागदपत्रे सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तिकडे शहर पोलिसांनी देखील पाटील यांच्या अटकपूर्व जामीनाला विरोध करण्याची तयारी सुरू केल्याची विश्वसनिय माहिती आहे. 

आरटीओच्या 25 लाखांची चौकशी 

प्रद्युम्न पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर एसीबी पोलिस महासंचालक कार्यालयाकडून त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महिला शिपायासोबत संवाद साधताना पाटील यांनी आपल्याला दर महिन्याला आरटीओ आणि रजिस्ट्रार कार्यालयाकडून 25 ते 30 लाख रुपये मिळतात असे तिला सांगितले होते. त्याचप्रमाणे ही वसुली कोण करतो त्याचे नाव देखील सांगितले होते. त्यामुळे कोण अधिकारी पाटील यांना पैसे देत होते, याचीही चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालक कार्यालयाने दिल्याचे सूत्राने सांगितले. या आदेशामुळे काही वसुली अधिकाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com