police s.p. Manoj Patil celebrates diwali with Rayeenpada victim's family | Sarkarnama

S.P. डॉ.मनोज पाटलांची दिवाळी राईनपाडा हत्याकांडातील मृतांच्या आप्तेष्टांसोबत !

सरकारनामा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

डॉ. मनोज पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयांसमवेत  हत्याकांडातील मृतांच्या नातेवाईकांच्या घरी भेट देऊन दिवाळीतील क्षण घालविले आणि त्यांच्यातील समस्येची जाणीव लक्षात घेतली. असे अधिकारीच दुर्लक्षित नाथपंथी डवरी समाजाला न्याय देवू शकतात. -मच्छिंद्र भोसले

मंगळवेढा : पोलिस अधिक्षक डॉ. मनोज पाटील यांनी त्यांच्या कुटूंबासमवेत यंदाच्या दिवाळीतील काही क्षण धुळे जिल्ह्यातील राईनपाडा हत्याकांडातील मृतांच्या आप्तेष्टां सोबत  घालवले.

मंगळवेढा तालुक्‍यातील खवे येथील नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पाच भिक्षा मागण्यासाठी धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे गेल्यावर, सोशलमिडीयातील अफवेमुळे मुले पळवणारी टोळी समजून नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पाच जणांची निर्घुण हत्या करण्यात आली होती . 

त्यामधील खवे येथील कै. भारत माळवे, कै. दादाराव भोसले, कै. भारत भोसले, अग्नू इंगोले यांच्या नातेवाईकांची जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. मनोज पाटील आपल्या आईसमवेत भेट घेत त्यांना दिवाळीनिमित्त फराळाचे साहित्य दिले.

यावेळी पोलीस निरीक्षक अनिल गाडे, भटक्‍या जाती व विमुक्त संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले, कार्याध्यक्ष गजेंद्र भोसले,दिगंबर माळवे, प्रकाश इंगवले, दादाराव भोसले, अशोक चौगुले, भैरू भोसले, शांताबाई माळवे, नर्मदा भोसले, आदीसह या समाजातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

यावेळी मनोज पाटील म्हणाले, की सोशल मीडियातील अफवेमुळे येथील कुटुंबकर्त्याचा नाहक बळी गेला असला तरी भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी समाजातील सर्वच घटकांनी जागृत राहणे आवश्‍यक आहे. केवळ भिक्षेवर आपले जीवन व्यथीत करणाऱ्या नाथपंथी डवरी गोसावी समाजाला महाराष्ट्रामध्ये भिक्षा मागण्यासाठी फिरताना त्यांना पोलीस खात्याकडून ओळखपत्र देण्याच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

मच्छिंद्र भोसले म्हणाले, अतिशय निर्घुणपणे हत्या केलेल्या कुटुंबाचा दिवाळीचा सण त्यांच्या कुटुंब प्रमुखाच्या गैरहजेरीत साजरा करताना ज्या वेदना होतात त्या वेदनेची जाणीव घेत जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. मनोज पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयांसमवेत  हत्याकांडातील मृतांच्या नातेवाईकांच्या घरी भेट देऊन दिवाळीतील क्षण घालविले आणि त्यांच्यातील समस्येची जाणीव लक्षात घेतली. असे अधिकारीच दुर्लक्षित नाथपंथी डवरी समाजाला न्याय देवू शकतात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख