आम्ही जातो आमच्या गावा...बंदोबस्त संपला; पोलिस दादा गावी परतले

उपराजधानीतील हिवाळी अधिवेशन शांततेत पार पडल्याने शनिवारी पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. सुमारे तीन हजार पोलिसांचा ताफा अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी नागपुरात दाखल झाला होता. हिवाळी अधिवेशन शांततेत पार पडावे व बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला संपूर्ण सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी विशेष व्यवस्था केली होती.
Police Returned from Nagpur After Assembly Session Bandobast
Police Returned from Nagpur After Assembly Session Bandobast

नागपूर : तब्बल दहा दिवसांचा हिवाळी अधिवेशनाचा महत्वाचा पोलिस बंदोबस्त संपला असून "आम्ही जातो आमच्या गावा...आमचा रामराम घ्यावा'' अशा शब्दात पोलिस दादांनी एकमेकांचा निरोप घेत आपापल्या गावाची वाट धरली. शनिवारी सायंकाळी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकमेकांची गळाभेट घेत निरोप घेतला. पोलिस दादांची घराकडे निघण्याची घाई आणि चेहऱ्यांवरील आनंद पाहण्यासारखा होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा बंदोबस्त निर्विघ्न ठरला हे विशेष.

उपराजधानीतील हिवाळी अधिवेशन शांततेत पार पडल्याने शनिवारी पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. सुमारे तीन हजार पोलिसांचा ताफा अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी नागपुरात दाखल झाला होता. हिवाळी अधिवेशन शांततेत पार पडावे व बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला संपूर्ण सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी विशेष व्यवस्था केली होती. बाहेरगावाहून बंदोबस्तासाठी आलेले काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी सायंकाळीच घर गाठले तर काही अधिकाऱ्यांना रविवारी सकाळी नागपुरातून कार्यमुक्त करण्यात येणार आहे.

पोलिस आयुक्‍तांचे अभिनंदन
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून हिवाळी अधिवेशनादरम्यान चोख बंदोबस्त ठेवणाऱ्या पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचे कौतूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी पोलिस आयुक्त उपाध्याय यांचे कडेकोट बंदोबस्ताबाबत अभिनंदनही केले. दरम्यान, हिवाळी अधिवेशन शांततेत पार पडावे यासाठी पोलिस अधिकाऱ्यांपासून ते पोलिस कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनीच मेहनत घेतली. या बंदोबस्ताचे श्रेय माझ्या प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याच्या मेहनतीला देत असल्याची प्रतिक्रिया डॉ. उपाध्याय यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

संत्रा बर्फी आणि बर्डीची शॉपिंग
नागपूराची प्रसिद्ध संत्री व संत्राबर्फी खरेदीसाठीही पोलिस कर्मचाऱ्यांनी कॉटन मार्केट व विविध हॉटेल्समध्ये गर्दी केली होती. अनेकांनी मुलांसाठी खेळणे आणि बर्डीत शॉपिंग केली. तसेच नागपुरात आलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांना एकमेकांसोबत सेल्फीचा मोह आवरता आला नाही. नागपुरात आपण भेटलो ही आठवण सदैव स्मरणात राहावी म्हणून पोलिसांनी सेल्फी काढले.

अश्रू आणि गळाभेट
अनेक महिला पोलिस कर्मचारी प्रशिक्षण घेताना सोबत होते. त्यांची पुन्हा अधिवेशनाच्या बंदोबस्तानिमित्त भेट झाली. तर काहींना नवीन मैत्रिणी मिळाल्या. बंदोबस्त संपल्यानंतर शनिवारी सायंकाळी घराकडे निघण्यापूर्वी काही महिला कर्मचारी एकमेकींची गळाभेट घेत होत्या. एकमेकींना 'बाय' करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते तर काहींनी चक्‍क अश्रूला वाट मोकळी करून पुन्हा भेटण्याचे आश्‍वासन घेत निरोप घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com