Police Officer Took Initiative to Help Flood Affected Village | Sarkarnama

पूरग्रस्त गावासाठी अधिकारी गेला धावून.....

मिलिंद संगई
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

ज्या गावाने घडविले, वाढविले, शिकवून मोठे केले, ते संपूर्ण गावच पुराच्या पाण्याखाली गेले. गावची अवस्था पाहिल्यानंतर एक संवेदनशील अधिकारी देवदूताप्रमाणे धावून गेला आणि गावच्या ऋणातून काही अंशी तरी उतराई करण्याचा छोटासा प्रयत्न त्याने केला....बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर हेच ते अधिकारी. 

बारामती शहर : ज्या गावाने घडविले, वाढविले, शिकवून मोठे केले, ते संपूर्ण गावच पुराच्या पाण्याखाली गेले. गावची अवस्था पाहिल्यानंतर एक संवेदनशील अधिकारी देवदूताप्रमाणे धावून गेला आणि गावच्या ऋणातून काही अंशी तरी उतराई करण्याचा छोटासा प्रयत्न त्याने केला....बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर हेच ते अधिकारी. 

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष या गावात शिरगावकरांचे बालपण गेले, दहावीपर्यंतचे शिक्षणही येथेच झाले. साधारण 11 हजार लोकवस्तीचे 1200 कुटुंबे असलेले हे छोटेसे गाव. पुराने अख्खे गावच उध्वस्त झाले. जवळपास 400 कुटुंबाचे शाळा, मंदीरातून स्थलांतर करावे लागले. पन्नासहून अधिक घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. अनेक कुटुंबांचे संसारच पाणी आपल्या सोबत घेऊन गेले. प्रचंड आपत्तीने हे गाव कोलमडून पडले. कोणी कोणाला धीर द्यायचा हा प्रश्न ग्रामस्थांपुढे उभा होता. या स्थितीत ग्रामस्थांच्या मदतीला धावून आले ते नारायण शिरगावकर. 

बारामतीतून मदतीचा ओघ सुरु झाला होता. आपल्या डीवायएसपींच्या गावाची व्यथा ऐकून व एक अधिकारी आपल्या गावाला सावरण्यासाठी धडपडतो आहे, हे पाहिल्यावर काही संस्थांनी याच गावाला मदतीचा हात पुढे केला. या संस्थांच्या मदतीने मग शिरगावकरांनी ऱेठरे गावासाठी सगळ्या कुटुंबांना किमान 15 दिवस पुरेल इतका किराणा, मच्छर अगरबत्ती, मेणबत्या, बिस्कीटाचे पुडे, धान्य, साड्या, सतरंजी, टॉवेल, ब्लँकेट, पाण्याच्या बाटल्या, फिनेल, खराटे, फॉगिंग मशीन असे साहित्य तातडीने रवाना देखील केले. 

एका गावाची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर बारामतीकरांच्या मदतीच्या भरवशावर घेतली आणि ती पूर्ण करण्यात ते यशस्वीही झाले. या गावातील पूर ओसरायला सुरवात झाली असली तरी पुराने केलेल्या नुकसानीनंतर या गावाला उभे राहण्यात काही महिन्यांचा कालावधी जाणार आहे, मात्र नारायण शिरगावकर यांच्यासारखे अधिकारी या गावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने हे गाव फिनिक्स पक्ष्याप्रमाणे नवीन भरारी घेण्यासाठी तयारी करत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख