police officer takes initiative in welfare of a village | Sarkarnama

गावाचे ऋण जलसंधारणातून फेडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याचा पुढाकार

तुषार खरात : सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

आपल्या गावातील दुष्काळ हटविण्यासाठी एका सहाय्यक पोलीस आयुक्तांनी (एसीपी) पुढाकार घेतला आहे.

मुंबई : जलसंधारणाची कामे प्रभावीपणे झाली तर दुष्काळ हटविण्यात बरेच यश मिळते. पण अशी कामे करण्यासाठी लोकांचा सहभाग आणि आर्थिक निधीची गरज असते. ही बाब ध्यानी घेऊन आपल्या गावातील दुष्काळ हटविण्यासाठी एका सहाय्यक पोलीस आयुक्तांनी (एसीपी) पुढाकार घेतला आहे.

एकत्रित आलेल्या गावांतील तरूणांना प्रोत्साहन देत जलसंधारणाच्या कामांच्या नियोजनापासून ते निधी संकलनापर्यंत ते सक्रीय झाले आहेत.

नाशिक येथील शहर गुन्हे शाखेत काम करीत असलेले अशोक नकाते यांनी आपले गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बीड जिल्ह्यात हसनाबाद (ता. धारूर) या गावचे ते रहिवाशी आहेत. हसनाबाद हे दुष्काळी गाव आहेच, पणअतिशय दुर्गम भागात आहे. तेथे एसटी बस सुद्धा जात नाही. दुचाकी नसेल तर मुख्य रस्त्यापासून साधारण एक  किलोमीटर चालत जाणे हाच येथील गावक-यांचा शिरस्ता. साहजिकच गाव प्रगतीपासून वंचित राहिलेले आहे.

गावांतील काही तरूणांनी एकत्रित येऊन जलसंधारणाच्या कामाला सुरूवात केली होती. साधारण ऑक्टोबर महिन्यापासून हे तरूण धडपडत होते. अशातच पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कपची माहिती मिळाली. त्यात सहभागी व्हायचा निर्णय या तरूणांनी घेतला. तरूणांचे हे प्रयत्न नखाते यांच्या कानावर आले. आपणही गावच्या दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न केले पाहीजेत म्हणून त्यांनी तरूणांनासहकार्य केले. 

गावात सीसीटी, डीप सीसीटी, छोटे सिमेंट बंधारे, बांधबंदिस्ती अशा विविध कामांचे नियोजन करण्यात आले आहे. गावकरी श्रमदानातूनकाम करण्यास तयार आहेत. खिशातून पैसेही द्यायला तयार आहेत. पण कामाचा आवाका  लक्षात घेऊन किमान ७ – ८ लाख रुपयांची गरज होती. त्यासाठी मग नखाते यांनी पुढाकार घेतला. स्वतः जवळपास २५ हजारांची देणगी त्यांनी दिली. त्यावर ते थांबले नाहीत त्यांनी आपल्या पोलिस खात्यातील व अन्य ठिकाणच्यामित्रांनाही या सामाजिक कामाची माहिती दिली. कुणी ५ हजार, कुणी १० हजार अशी मदत करीत आहेत. एका उद्योजकांना ही माहिती मिळाल्यानंतर चार सिमेंट बंधारे गावात बांधून देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.

गावातील जे तरूण बाहेर नोकरी करीत आहेत, त्यांनीही चांगला निधी दिला आहे. निधी संकलनाबरोबरच कामाचे नियोजन व गुणवत्ता याकडेही ते लक्ष देत आहेत. येत्या काही दिवसांत रजा काढून मी श्रमदान करण्यासाठी गावी जाणार
असल्याचेही नकाते यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख