कोरोनाला हरवले़, स्वागताला जमलेल्यांनी मात्र 'त्या' पोलिस अधिकाऱ्याला मात्र रडवले! - Police officer Became Sentimental While Returning After Taking treatment of Corona | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाला हरवले़, स्वागताला जमलेल्यांनी मात्र 'त्या' पोलिस अधिकाऱ्याला मात्र रडवले!

संपत देवगिरे
मंगळवार, 28 एप्रिल 2020

जगभर दहशत पसरवणारा कोरोनाचे नाव ऐकून भल्या भल्यांचे हातपाय गारठतात. त्यात ठाणे जिल्ह्यातील एक वरिष्ठ पोलिस निरिक्षक पाॅझिटिव्ह आढळले तेव्हा अगदी तसेच घडले. मात्र अनेक क्लिष्ट गुन्हे उगडकीस आनणा-या या अधिकाऱ्याने पंधरा दिवसांत कोरोनाला हरवले

नाशिक : जगभर दहशत पसरवणारा कोरोनाचे नाव ऐकून भल्या भल्यांचे हातपाय गारठतात. त्यात ठाणे जिल्ह्यातील एक वरिष्ठ पोलिस निरिक्षक पाॅझिटिव्ह आढळले तेव्हा अगदी तसेच घडले. मात्र अनेक क्लिष्ट गुन्हे उगडकीस आनणा-या या अधिकाऱ्याने पंधरा दिवसांत कोरोनाला हरवले. ते जेव्हा उपचारानंतर बाहेर पडले तेव्हा त्यांचे अगदी विजयी वीरासारखेच स्वागत झाले. त्यांच्या निवासस्थानी तर शेकडोंची गर्दी झाली. रांगोळ्या, घोषणा, औक्षण करुन त्यांचे स्वागत हे सर्व पाहून त्यांनी कोरोनाला हरवले, मात्र या स्वागताने त्यांना रडवले.

दोन आठवड्यांपूर्वी या पोलिस अधिकाऱ्याचा कोविड १९ विषाणूचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे सबंध पोलिस यंत्रणेलाच हादरा बसला होता. असा अहवाल आलेले ते पहिले वरिष्ठ अधिकारी होते. त्यानंतर त्यांनी मुंबईत खाजगी रुग्णालयात उपचार घेतला. अर्थात कोविड १९ विषाणूचा बंदोबस्त करील असा उपचार नाहीच. मात्र आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी हे सर्व उपचार घेत शंभर टक्के बरे झाल्याचे सिद्ध केले. दोन दिवसांपूर्वी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. सलग दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यावर काल दुपारी त्यांना रुग्णालयातून घरी जाण्यास परवानगी दिली. 

हे अधिकारी रुग्णालयातून घरी परतत असतांना ठाणे येथे आनंदनगर नाक्यावर सर्व पोलिस कर्मचारी गुच्छ घेऊन त्यांच्या स्वागताला हजर होते. त्यांनी अतिशय उत्साहाने त्यांचे स्वागत केले. यावेळील बरे होऊन आलेले हे अधिकारी स्वतः सगळ्यांना सोशल डिस्टन्स विषयी वारंवार सुचना देत होते. त्यानंतर ते रहात असलेल्या ठिकाणी येण्यास त्यांना रात्रीचे नऊ वाजले होते. एव्हढा उशीर होऊन देखील सायंकाळ पासूनच येथील नागरीक त्यांच्या स्वागतासाठी तयारी करीत होते. नागरीकांनी परिसरातल्या रस्त्यावर रांगोळ्या काढल्या होत्या. त्यांच्या स्वागताची वाक्ये रस्त्यावर रंगवली होती. जवळपास शंभर मीट लांबवरुनच त्यांना गर्दीमुळे घरी चालत जावे लागले. 

तेव्हा उत्साही शेजारी, नागरीक भारत माता की जय अशा घोषणा देत होते. हात जोडून शुभेच्छा देत होते. अनेक जण सेल्फी काढत होते. घरी गेल्यावर त्यांच्या पत्नींनी त्यांचे औक्षण केले. शेजारच्या अनेक भगिनी त्यांच्या स्वागतासाठी औक्षण करीत होते. हा उत्साह व प्रेम पाहून हे अधिकारी भारावून गेले. त्यांनी कोरोनाला सहज हरवले, मात्र शेजा-यांनी त्यांना जिंकले. ते आपल्या भावना नियंत्रीत करु शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते. हात जोडून ते सगळ्यांचे आभार मानत होते. कोरोनावरील विजयाचे हे एक आगळे चित्र यावेळी पहायला मिळाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख