धुळ्यात गोळीबार; `सीएए` विरोधातील मोर्चाला हिंसक वळण

धुळे शहरात मुस्लीमबहुल भाग व प्रभागांच्या सीमारेषेवरील परिसरात कडकडीत "बंद' होता. दुपारनंतर मुख्य आग्रा रोडवरील बाजारपेठ खुली झाली. मात्र, विविध घटनांची माहिती मिळाल्याने नागरिकांनी घरी राहणे पसंत केले. शाळा लवकर सोडण्यात आल्या. शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
dhule firing
dhule firing

धुळे : भारतीय नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चाने पुकारलेल्या "बंद'ला जिल्ह्यातील शिरपूर व धुळे शहरात हिंसक वळण लागले. दगडफेक, जाळपोळ, नासधूस असे प्रकार करणाऱ्या जमावाने चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यासमोर बंदोबस्तासाठी असलेले अधिकारी, कर्मचारी "टार्गेट' केले. त्यात पोलिस उपअधीक्षकासह 12 कर्मचारी जखमी झाले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांसह "एसआरपी'च्या जवानांनी हवेत गोळीबार केला.

जिल्ह्यात "बंद'चा फारसा परिणाम जाणवणार नाही, असे वातावरण असताना शिरपूर येथे सकाळी पावणेदहाला एसटीवर दगडफेक झाली. त्यात दोन प्रवासी जखमी झाले. या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दुपारी एकनंतर धुळे शहरातील चाळीसगाव व मालेगाव रोडला जोडणाऱ्या नवीन शंभर फुटी रस्त्यावर जमाव जमू लागला. या रस्त्यावर चाळीसगाव रोड पोलिस ठाणे आहे. या परिसरातील काही भंगारातील वाहने आणि मोटारसायकली जमावाने जाळल्या. चार वाहनांवर दगडफेक केली. टपऱ्यांची नासधूस केली.

पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. "एसआरपी'च्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले. असे असताना जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली. त्यामुळे हिरे यांच्यासह "एसआरपी'च्या जवानांनी जमावाला पांगविण्यासाठी हवेत चार राउंड फायर केले. दगडफेकीत पोलिस उपअधीक्षक हिरे, पोलिस निरीक्षक प्रकाश मुंडे यांच्यासह 12 कर्मचारी जखमी झाले. स्थिती नियंत्रणासाठी कठोर पवित्रा घेत पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांसह योग्य ती कारवाई केली.

व्हीडीओ शुटींगच्या माध्यमातून संशयितांचा शोध घेणे आणि गुन्हे दाखल करण्याची कारवाई पोलिस प्रशासनाने सुरू केली आहे. शंभर फुटी रस्त्यावर दगडांचा खच झाल्याने स्वच्छतेसाठी महापालिकेचे सहकार्य पोलिसांनी घेतले. या संवेदनशील भागात अधिकचा बंदोबस्त असून "एसआरपी'च्या तुकड्याही वाढविल्या जात आहेत. स्थिती नियंत्रणात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com