police did not fail in a mock trap to loose curfew for bribe in Nashik | Sarkarnama

`चहापाणी` द्यायचा ट्रॅप नांगरे पाटलांचा : पोलिस परीक्षेत पास

संपत देवगिरे
मंगळवार, 31 मार्च 2020

"कोरोना' विषाणू रोजच कितीतरी जणांची अनेक प्रकारे परिक्षा घेत असतो. त्यात सर्वाधीक संवेदनशीलता बॅरीकेडींग केलेल्या नाक्‍यावरील पोलिसांच्या संवेदनशीलता अन्‌ संयमाला रोज शेकडो वेळा आव्हान मिळते. अगदी परिक्षाही होते, कधी कधी वरिष्ठच "ट्रॅप' लावून ही परिक्षा घेतात की काय अशी शंकाही येते. हा ट्रॅप नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीच लावला होता.

स्थळ : नाशिकमधील मखमलाबाद चौफुली. हा चौक नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत येतो. एका वाहनातून चौघे येतात अन्‌ बंदोबस्तावरील कर्मचाऱ्याला म्हणतात, ``अर्जंट काम आहे. औरंगाबादला जायचे आहे. चहापाणी घ्या अन्‌ आम्हाला जाऊ द्या. आम्ही कोणालाच सांगणार नाही. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. पण त्यामागचे इंगित वेगळेच आहे.

म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मखमलाबाद चौफुली ही मुंबई आग्रा व नाशिक औरंगाबाद या दोन महामार्गांशी संलग्न आहे. त्यामुळे जिल्हाबंदीची अंमबजावणी करण्यासाठी तिचे महत्व आहे. येथे रोजच शेकडो वाहने येतात व विविध कारणे सांगून पुढे जाण्याची परवानगी मागतात. एक वरिष्ठ अधिकारी आणि पाच पोलिस कर्मचारी येथे बंदोबस्ताला आहेत.

तीस मार्च रोजी येथे असाच एक परिक्षा घेणारा प्रसंग घडला. चौघेजण एका जीपमधून आले. आम्हाला औरंगाबादला जायचे आहे. खूप महत्वाचे काम आहे, जाऊ द्या, अशी विनवणी करु लागली. पोलिस कशाने बधतात हे माहीत असल्याने पुढच्या सीटवरील व्यक्ती हवे तर "चहापाणी' घ्या. आम्ही कोणालाही सांगणार नाही. कोणालाही कळणार नाही, अशी लाघवी विनंती करीत होता. मात्र संबंधीत पोलिसांनी काही त्याला दाद दिली नाही. "अजिबात जाता येणार नाही. शहरात काय स्थिती आहे हे आपल्याला माहिती नाही काय?,' अशा शब्दात त्यांनी खडसावले.

गाडीतल्या मंडळींचा हट्ट सुरुच राहिल्याने या पोलिसाने त्याच्या वरिष्ठांना बोलावले. वरिष्ठांनी "काय काम आहे औरंगाबादेत, अशी विचारणा केली. त्यावर अंत्यसंस्काराला जायचे आहे, असे गाडीतील मंडळींनी सांगितले. तो पोलिस अधिकारी म्हणाला, ``नातेवाईकांशी बोलतो. त्यांना फोन लावून द्या. तिकडचं उरकून घ्या. पण तुम्हाला जाता येणार नाही,`` त्यालाही चहापाण्याची आॅफर दिल्यावर तुम्ही असला विषय काढताचा कसा, असे म्हणत त्या अधिकाऱ्याने गाडी मागेच घ्यायला लावली.

संबंधीत घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाल्यावर म्हसरुळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्याशी संपर्क केला असता. त्यांनी या व्हीडीओ विषयी अनभिज्ञता व्यक्त केली. मात्र हा नाका संवेदनशील आहे. त्यामुळे सर्वच कर्मचारी सजग असतात. जर खरोखर काही वैद्यकीय कारण असेल, एखादी गर्भवती, रुग्ण, वैद्यकीय फाईल असेल तर तपासणी करुन माणुसकीतून सोडावे लागते. मात्र विनाकारण जाणाऱ्यांचा आम्ही कधीही अपवाद करीत नाही. त्यांना सोडतच नाही. रोज किमान शंभर ते सव्वाशे लोक असे बहाणे सांगतात. मात्र त्याला आम्ही बधत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीच ही परीक्षा घेतली होती. हे कर्मचारी परीक्षेत पास झाल्याने त्यांना रिवार्डही जाहीर करण्यात आला आहे. पाच हजार रुपयांचे बक्षीस त्यांना मिळणार आहे. यात म्हसरूळ स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे , पीएसआय मयुर पवार, एपीआय शिवाजी आहिरे, पोलिस कॉन्स्टेबल भाऊसाहेब शेळके, पोलिस कॉन्स्टेबल सुनील चव्हाण अशी या कार्यक्षम पोलिसांची नावे आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख