राहुल जगताप यांच्याकडून जिवे मारण्याची धमकी : जगतापांनी आरोप फेटाळले

नगर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरून आरोप-प्रत्यारोप!
ex mla rahul jagtap
ex mla rahul jagtap

श्रीगोंदे : जिल्हा बॅंक निवडणुकीत लुडबूड करू नको, अशी दमबाजी माजी आमदार राहुल जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. काल (रविवारी) रात्री बारा वाजता मोटार अडवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप जिल्हा बॅंकेचे संचालक दत्तात्रेय पानसरे यांनी केला आहे. जगताप यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

बेलवंडी पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे. पानसरे म्हणाले, ""कोथूळ घटनेचा व आपला संबंध नाही. कुकडी कारखाना वाचविण्यासाठी जगताप यांना बॅंकेत जायचे आहे. त्यामुळे आपली त्यांना अडचण होत आहे. ते आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातून त्यांनी सचिवाला गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. रविवारी रात्री बारा वाजता आपण नगरला जात असताना जगताप यांच्यासह कालिदास जगताप, अक्षय काळे व इतर दहा ते बारा जणांनी विसापूर फाटा येथे मोटार अडविली. शिवीगाळ सुरू करून तू जिल्हा बॅंक निवडणुकीत डोके चालवू नकोस, जिवे मारून टाकीन असे म्हणत माझ्या गळ्यातील चेन तोडून घेतली. मला व माझ्या कुटुंबाला जगताप यांच्यापासून धोका आहे.''

खोटे आरोप न थांबवल्यास तुमची पापे उघड करू : जगताप
रात्रीच्या बारा वाजता मोटार अडवून गळ्यातील सोने लुटण्याचे धंदे आमचे नव्हेत, तर आरोप करणारे त्यात माहीर आहेत. आमच्यावर तात्यांचे संस्कार आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. खोटे आरोप करून मोठे होण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी त्यांची पापे तपासावीत. "कुकडी'ची नव्हे, तर आपल्या शिक्षण संस्थांची काळजी करा. तुमची सगळी पापांची फाइल आमच्याकडे आहे, ती जाहीर करण्याची वेळ आणू नका, असा इशारा माजी आमदार राहुल जगताप यांनी दिला.

जिल्हा बॅंकेचे संचालक दत्तात्रेय पानसरे यांनी जगताप यांच्याविरुद्ध बेलवंडी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावर बोलताना जगताप म्हणाले, ""माझ्यासह ज्यांच्यावर आरोप केले आहेत, ते रात्री बाराच्या वेळी कुठे होते याचे ठोस पुरावे आहेत. मात्र, आरोप करणारे रात्रभर नेमके कुठे फिरतात, याचा शोध घ्यावा लागेल. कुकडी कारखाना वाचविण्याची परिस्थिती आमच्यावर आली नाही आणि येणारही नाही. कारखाना भक्कम आहे.''

आरोप करणाऱ्यांनी त्यांच्या शिक्षण संस्था कशा उभारल्या, त्या कशा चालवितात, कुणाला किती लुटतात याची फाइल आमच्याकडे आहे. तुमचे मागचे गंभीर गुन्हे कसे मिटविले याचीही लोकांना माहिती आहे. माझ्यावर खोटे आरोप करून मोठे होण्याचे कारस्थान करणाऱ्यांना लोकांच्या घरावर सत्तेच्या माध्यमातून दरोडे टाकण्याची सवय लागली आहे. माझ्यावर खोटे आरोप थांबले नाही, तर तुमचाही सगळा हिशेब उघड करू. मी कुंडलिकराव जगताप यांचा मुलगा आहे, याचा विसर पानसरे यांनी पडू देऊ नये, असेही जगताप म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com